लातूर : राज्याचे कामगारमंत्री आणि भाजपचे लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. लातूरच्या देवणी तालुक्यातील साकोळ येथील विक्टोरिया एग्रो फ़ूड प्रोसेसिंग प्राइवेट लि. कंपनीच्या कर्जासाठी युनियन बँक ऑफ़ इंडिया तसेच इतर बँकेची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. दरम्यान, कर्ज प्रकरणाशी माझा संबंध नाही. या संदर्भात आपण स्पष्टीकरण देणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
काळ्या ज्वारीपासून मद्यार्क निर्मितीचा हा प्रकल्प आहे. बनावट गहान ख़त आणि कागदपत्रे दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सध्या हे प्रकरण सीबीआयकडे आहे. मात्र आता मंत्री असल्यामुळे बँकेने मेहरबानी दाखवीत जवळपास ७५ कोटी रुपयांचे मुद्दल आणि व्याज कमी करून २५ कोटी रुपये करण्यात आल्याची माहिती आहे.
माझा आणि त्या कारखान्याचा काहींच संबंध नाही. या भागाचा विकास व्हावा यासाठी आपण संबंधितांना या भागात कारखाना उभा करण्याची विनंती केली. आपली राजकीय कारकिर्द जाणिवपूर्वक डागाळण्यासाठी विरोधकांकडून वारंवार व्हिक्टोरीया कंपीच्या प्रकरणाचा उल्लेख केला जातो. माझ्या त्याच्याशी काहीच संबंध नाही. मी केवळ त्यांचा जामिनदार आहे. कर्ज प्रकरणाशी माझा संबंध नाही. या संदर्भात आपण १ तारखेस स्पष्टीकरण देणार आहे, अशी प्रतिक्रिया लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.