शिक्षकच असं वागत असतील तर...? 'या' कारणाने नववीतल्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं अतूट असतं, पण या नात्याला काळीमा फासणारी घटना लातूरमध्ये घडली असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.   

Updated: Jan 20, 2023, 04:57 PM IST
शिक्षकच असं वागत असतील तर...? 'या' कारणाने नववीतल्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल title=

लातूर : शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं (Teacher-Studnet Relation) अतूट असतं. समाज घडवणारा सर्जनशील घटक म्हणजे शिक्षक. देशाला बलशाली बनवण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणं आखली जातात, विद्यार्थ्यांमध्ये त्याची रूजवणी करणारा आणि विद्यार्थ्यांवर संस्कार घडवणारा घटक म्हणजे शिक्षक. पण हाच शिक्षक जेव्हा चुकीचं वागतो. तेव्हा विद्यार्थ्यांनी कोणाकडे बघायचं असा प्रश्न निर्माण होतो. लातूरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षकाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याने नववी वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (9th standerd girl commits suicide due to teacher teasing)

काय आहे नेमकी घटना?
लातूरच्या एका नामांकित शाळेत ही मुलगी नववी वर्गात शिकत होती. याच शाळेत गणिताचा विषय शिकवणारे शिक्षक राहुल पवार हे या मुलीला कॉपी करणारी मुलगी म्हणून चिडवत असत. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे ती मुलगी मानसिकरित्या खचली होती. शाळेत इतर विद्यार्थ्यांसमोर अपमान होत असल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. याच मानसिकतेतून त्या मुलीने घरी एकटी असताना गळफास घेत आत्महत्या केली.

मुलीच्या आत्महत्येने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. औसा रोड भागात इंजिनिअरिंग कॉलनीत मृत मुलगी आणि तिचं कुटुंब राहतं. इथेच त्या मुलीने आत्महत्या केली. याप्रकरणी शासकीय रुग्णालयाचे डॉ. प्रवीण गजाकोश यांच्या माहितीवुन शिवाजीनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

आत्महत्या करण्याआधी मुलीने चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोलिसांनी हि चिठ्ठी ताब्यात घेतली असून तपासानंतर आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.