लातूरसह राज्यातील २२ जिल्ह्यात सॅनिटरी व्हेंडिंग मशीन

राज्यातील २२ जिल्ह्यात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन लावण्यात आल्या आहेत. 

Updated: Jun 6, 2019, 02:56 PM IST
लातूरसह राज्यातील २२ जिल्ह्यात सॅनिटरी व्हेंडिंग मशीन title=

लातूर : मासिक पाळी तसेच सॅनिटरी नॅपकीन्स याबाबत बोलणे टाळले जाते. सॅनिटरी पॅड्सची किंमत जास्त असल्याने खरेदी करताना प्रश्न उभा राहतो.  सॅनेटरी पॅड्स मुलींना परवडणाऱ्या किंमतीत मिळण्यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत राज्यभरात विविध ठिकाणी सॅनिटरी वेंडींग मशिन्स लावण्यात आल्या आहेत. यामध्ये केवळ पाच रुपयात सॅनिटरी पॅड्स उपलब्ध होत आहेत. लातूरमध्येही असाच एक उपक्रम नुकताच पार पडला. अखिल भारतीय माहेश्वरी महिला संघटनेच्या वतीने नुकतेच १५५१ सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन देशभरात विविध ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र माहेश्वरी महिला संघटनेच्या वतीने लातूरसह राज्यातील २२ जिल्ह्यात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन लावण्यात आल्या आहेत. 

लातूरच्या दयानंद महाविद्यालयात ०७ सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन लावण्यात आल्या आहेत. अवघ्या ०५ रुपयाचे कॉईन टाकून सॅनिटरी नॅपकिन महिला-विद्यार्थिनींना मिळणार आहे. लातूर शहरात विविध महिलांची वर्दळ असलेल्या विविध २० ठिकाणी अशा मशीन लावण्यात येणार आहेत. शाळा, कॉलेज, बसस्टॅन्ड, बँक, रेल्वे स्टेशन, मंगल कार्यालय, सरकारी कार्यालये किंवा महिला कर्मचारी जास्त आहेत त्या ठिकाणी या व्हेंडिंग मशीन लावल्या जाणार आहेत.

 यामुळे शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि महिलांची सोय होणार आहे. महाराष्ट्र माहेश्वरी महिला संघटनेच्या या उपक्रमाचे महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका यांनी स्वागत केलं आहे.