Maratha Reservation Protest: मराठा आऱक्षणासाठी विशाल मोर्चा (Maratha Arakshan Morcha) घेऊन अंतरवाली सराटी येथून मुंबईसाठी निघालेले मनोज जरांगे पाटील आता पुण्यात दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीला मुंबईत दाखल होणार असून, आझाद मैदानात आंदोलन (Azad Maindan Andolan) करणार आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोवर मागे हटणार नसल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. मात्र हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचं सांगत गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान कोर्टाने मनोज जरांगे पाटील, आझाद मैदान पोलीस आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. यानंतर प्रतिक्रिया देताना गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कोर्टाने जरांगेंना हजर राहण्यास सांगितलं असून, हे मोठं यश असल्याचं ते म्हणाले आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात जालन्यातील हिंसाचाराचा दाखला देत त्यांना मुंबईत येण्यासाठी परवानगी देऊ नये आणि खटला दाखल करावा अशी मागणी केली होती. सुनावणीदरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी जालन्यात 29 पोलीस जखमी झाले असतानाही एफआय़आरमध्ये सर्वांचं नाव नाही असा आरोप केला. तसंच मोर्चा मुंबईत आल्यास कायदा-सुव्यवस्थेचा दाखला करत त्यांना रोखण्याची मागणी केली.
मनोज जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच हायकोर्टाची नोटीस; दिला दोन आठवड्यांचा वेळ
हायकोर्टाने मनोज जरांगे यांना आंदोलनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले असून त्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. आंदोलन कशाप्रकारे करणार आहेत? सोबत कोण असणार आहे? कशी यंत्रणा आहे? सोबत किती लोक असतील? ही सगळी माहिती त्यांना कोर्टात द्यावी लागणार आहे. आझाद मैदान पोलिसांनाही नोटीस बजावण्यात आली असून, जर लाखोंच्या संख्येने लोक आले तर काय व्यवस्था करण्यात आली आहे याची विचारणा केली आहे. राज्य सरकारलाही कोर्टाने नोटीस पाठवली असून ही तुमची जबाबदारी असल्याचं सांगितलं आहे. तुमचं नेमकं काय नियोजन आहे याची माहिती त्यांनी मागवली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत की, "जरांगेंना हजर राहण्यास सांगितलं असून, हे मोठं यश आहे. सरकारचं धोरण मायबाप धोरण आहे. सर्व समाजासाठी त्यांचं सारखं धोरण असतं. पण 60 पोलीस धारातीर्थ पडतात, त्यांच्यार हल्ले होतात. त्याचं मनोबल कमी होत आहे. सरकारचे मंत्री दोन विभागात वाटले गेले आहेत हे आम्ही कोर्टाला दाखवलं. मंत्र्यांना पोलिसांना पत्रं द्यावी लागत आहेत. राजकारण्यांमुळे पोलीस हतबल आहेत. यामुळे कोर्टाने अर्ज नसेल आणि बेकायदेशीर निघाले असतील तर थांबा असं सांगितलं आहे".
"कायदा सर्वात मोठा असून, कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही असा हल्लाबोल यावेळी त्यांनी केला. "शाहीनबागच्या आंदोलनाची पुनरावृत्ती होऊ नये असं कोर्टाने म्हटलं आहे. आझाद मैदानाची 5000 ची क्षमता आहे. दुसरं कोणतंही मैदान देण्यासारखं नाही. त्यामुळे जरागेंना मुंबईत येण्याचा कायदेशीर हक्क नाही. पण तसा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करावी लागेल. कारण आता कोर्टाचा आदेश आहे, राज्य सरकारचा नाही. पोलीस महासंचालक, आझाद मैदानचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी जबाबदारी स्विकारली पाहिजे. मंत्री काय म्हणतात याऐवजी कोर्ट काय सांगत त्यानुसार कारवाई करावी लागणार आहे".