Maratha Reservation Survey : सलग दुस-या दिवशीही मराठा सर्व्हेक्षणाचा बोजवारा उडालाय. तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे दोन दिवसांत दोन टक्केसुद्धा माहिती जमा झालेली नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय. पुण्यातल्या गोखले इन्स्टीट्युटनं सर्व्हेक्षणासाठी हे App बनवलेलं आहे. मात्र ते व्यवस्थित चालत नसल्यामुळे कर्मचा-यांना सर्व्हेक्षण करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यात माहिती भरली जात नाहीय. भरली तर त्यातून येणारा निष्कर्ष पूर्णत: चुकीचा निघतोय. दहा कुटुंबांची माहिती भरल्यास तीस कुटुंबांची माहिती दिसते. यासंदर्भात अधिका-यांनी गोखले इन्स्टिट्युटसोबत व्हीसीही घेतली. मात्र समाधानकारक तोडगा निघू शकलेला नाही. या सर्व अडचणींमुळे ३१ जानेवारीपर्यंत सर्व्हेक्षण कसं पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित होतोय.
चंद्रपुरात माहिती अपडेट करण्यासाठी नेटवर्कचा अडथळा
चंद्रपुरात मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांना डिजिटल प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्व माहिती मोबाईल मध्ये एकत्र फीड करायची असल्याने इंटरनेट कळीचा मुद्दा आहे. कमकुवत इंटरनेटमुळे अनेक ठिकाणी सर्वेक्षकांचा वेळ वाया जात आहे. याशिवाय केवळ दोनच प्रवर्गातील माहिती भरायची असल्याने सर्वेक्षकांना इतर समाजातील लोकांच्या प्रश्नाचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार सर्व्हेक्षणाच्या कामाकरीता चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, शिक्षक व इतर कर्मचारी असे एकूण 4008 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कृषी अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, मंडळ अधिकारी व इतर असे एकूण 270 अधिका-यांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सर्व्हेक्षणाच्या अनुषंगाने आयोगाकडून नियुक्त पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट येथील प्रशिक्षकांकडून जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नोडल अधिकारी तसेच प्रत्येक तालुका प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. घरोघरी येऊन सर्व्हेक्षणाचे कामकाज करणा-या प्रगणकांना आयोगाकडून ओळखपत्र देण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागात दुर्गमतेमुळे हे सर्वेक्षण प्रशासनाच्या दृष्टीने आव्हान ठरणार आहे.
मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्ध पातळीवर
पालघर जिल्ह्यात देखील मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू करण्यात आल आहे . कालपासून पालघर जिल्ह्यात शिक्षकांसह इतर शासकीय कर्मचारी या सर्वेक्षणाच्या कामात व्यस्त असून घराघरात जाऊन हे अधिकारी मराठा कुणबी नोंदणीची तपासणी करून माहिती गोळा करत आहेत . यासाठी एसटी समाजातील नागरिकांसाठी दोनच प्रश्न असून ज्यांची जात मराठा , कुणबी किंवा इतर आहे त्यांच्यासाठी 15 प्रश्नांची प्रश्नावली केली जात असून या नोंदी भरण्याचा काम सध्या पालघरच्या ग्रामीण भागात सुरू करण्यात आल आहे . यामध्ये सर्वेक्षण पूर्ण झालेल्या घरांवर मार्करने नोंद केली जात असून येत्या 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करून या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांसमोर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.