Pune Ganpati Visarjan LIVE : 28 तासांच्या मिरवणुकीचा विक्रम मोडणार?

Ganpati Visarjan in Maharashtra Live Updates: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज राज्यात बाप्पाला मनोभावे निरोप देण्यात येणार आहेत. 

Pune Ganpati Visarjan LIVE : 28 तासांच्या मिरवणुकीचा विक्रम मोडणार?

Ganpati Visarjan 2024 in Maharashtra Live Updates: लाडका बाप्पा आज निरोप घेणार आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आज जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकींना मोठी गर्दी असते. पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणपती आणि मानाच्या पाच गणपतींची आज मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणुक निघणार आहे. तसंच, नागपूरसह राज्यातील इतर जिल्ह्यातही विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळणार आहे. 

17 Sep 2024, 13:17 वाजता

Ganapati Visarjan Celebration Live Updates: जळगाव महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीपासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात 

आज लाडक्या बाप्पाचे विसर्जन होणार असून जळगाव शहरातील जळगाव महानगरपालिकेच्या मानाच्या गणपती ची आरती करून मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणुकीला जळगाव शहरातून सुरुवात झाली आहे. जळगाव शहरात 300 पेक्षा अधिक मंडळ असून जोपर्यंत जळगाव शहर महापालिकेच्या मानाच्या गणपतीची आरती होवून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत नाही तोपर्यंत जळगाव शहरातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही

17 Sep 2024, 13:01 वाजता

Ganapati Visarjan Celebration Live Updates: मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम बेलबाग चौकात दाखल

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम बेलबाग चौकात दाखल झाला आहे. फुलांची भव्य आकर्षित सजावट केलेल्या रथावर विराजमान होऊन भव्यविसर्जन मिरवणूक निघाली आहे

17 Sep 2024, 12:42 वाजता

Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुणे विसर्जन मिरवणुकीला परदेशी पाहुण्यांची हजेरी

गणपती विसर्जन मिरवणुकीत परदेशी पाहुण्यांनी देखील हजेरी लावली. गणपती बाप्पा मोरया म्हणत हे उत्स्फूर्तपणे मिरवणूक मध्ये सहभागी झाले. भारतीय पारंपरिक पेहराव करत हे सर्वजण सहभागी झाले.

17 Sep 2024, 12:39 वाजता

Ganapati Visarjan Celebration Live Updates: मानाचा पहिला विशाल गणपती मिरवणूक सुरू

अहमदनगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते महापूजा करून शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीये. मानाच्या 12 गणपतीपैकी श्री विशाल गणपती हा प्रथम क्रमांकाचा गणपती आहे.शहरातील 17 मंडळे आणि इतर घरगूती गणपतींची तब्बल 14 तास विसर्जन मिरवणुक चालते. त्यानंतर विसर्जन मार्गावरून मिरवणूक ही नेप्ती नाका परिसरातील विसर्जन कुंड येथे पोहोचते. 

17 Sep 2024, 12:03 वाजता

Ganapati Visarjan Celebration Live Updates:  पुण्यात घरगुती लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची गर्दी 

आज अनंत चतुर्दशी असून आज १० दिवसाच्या मुक्कामा नंतर लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय,पुण्यात मानाच्या गणपती सोबत मोठ्या संख्येने घरगुती गणपती हे बसवले जातात आणि आज या लाडक्या बाप्पाला पुणे महानगर पालिकेने बनवलेल्या कृत्रीम हौदात विसर्जीत केलं जातंय 

17 Sep 2024, 11:57 वाजता

Ganapati Visarjan Celebration Live Updates: मानाचा दुसरा गणपती पालखीत विराजमान

बेलबाग चौकात मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी दाखल झाला आहे. पारंपारिक पद्धतीने गणेशाची मूर्ती पालखीत विराजमान असून भंडाऱ्याची उधळण करून बाप्पाची मिरवणूक सुरू झाली आहे.

17 Sep 2024, 11:18 वाजता

Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूकीला सुरुवात

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली आहे. मंडईतील टिळक पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीची आरती झाली. पालकमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार रविंद्र धंगेकर, उद्योजक पुनीत बालन, गणेशभक्तांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली. पालकमंत्री अजित पवार यांनी आरतीचा मान  स्थानिक आमदार रवींद्र धंगेकर यांना दिला. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, ढोल ताशा गजर अशा मंगलमय वातावरणात बाप्पा मार्गस्थ.

17 Sep 2024, 11:17 वाजता

Ganapati Visarjan Celebration Live Updates: अकोल्याच्या मानाचा गणपती 'बाराभाई गणेशाच्या' विसर्जनाला सुरुवात

अकोल्यात ही सार्वजनिक गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे. अकोल्याच्या मानाचा गणपती " बाराभाई गणेशाच्या " पूजे नंतर गणेश सार्वजनिक विसर्जनाला सुरुवात होते. बाराभाई गणेश हे आकोल्याचा मानाचा गणेश आहे , ही मूर्ती शाडूमातीची असून 12 विविध जातींच्या लोकांनी एकत्रित येऊन या मंडळाची स्थापना केली होती.

17 Sep 2024, 11:16 वाजता

Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: श्रॉफ बिल्डींग पुष्पवृष्टीवर सर्वांच्या नजरा 

चिंचपोकळी इथं असणाऱ्या श्रॉफ बिल्डींग पुष्पवृष्टी मंडळाच्या माध्यमातून आता इथून जाणाऱ्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. इथं प्रथम परळच्या महाराजावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यानंतर या मार्गावरून अनेक गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पुढे जातील. 

17 Sep 2024, 10:22 वाजता

Ganapati Visarjan Celebration Live Updates: नागपूरचा राजा गणरायाची विसर्जन मिरवणूक

नागपूरच्या राजा गणरायाची विसर्जन मिरवणूक निघाली आहे.तुळशीबाग येथून बाप्पाची ही दिमाखदार विसर्जन मिरवणूक निघाली असून महाल, संत्रा मार्केट यासह शहरातील विविधभागातून ही विसर्जन मिरवणूक जाईल. ढोल ताशांच्या गजरात बाप्पा आपल्या गावाला निघाले आहे.