19 Nov 2024, 08:07 वाजता
विधानसभा निवडणुकीनंतर BMC मध्ये अभियंता भरती; ऑनलाइन अर्ज 26 नोव्हेंबरपासून उपलब्ध
मुंबई महापालिकेतील कनिष्ठ व दुय्यम अभियंत्यांची पदभरती आता निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार 11 नोव्हेंबरला सुरू होणारी ऑनलाइन अर्जप्रक्रिया आता 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत राबवली जाणार आहे. मुंबई महापालिकेत गेल्या चार-पाच वर्षांपासून भरती न झाल्याने कनिष्ठ व दुय्यम अभियंत्यांची पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी अभियंता संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता.
19 Nov 2024, 08:04 वाजता
निवडणुकीनिमित्त एसटीच्या नऊ हजार बस धावणार
राज्यात विधानसभा निवडणूक होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाला मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि मतदानाचे यंत्र, साहित्य पोहचवण्यासाठी एसटीच्या बस धावणार आहेत. राज्यातील मतदानासाठी एसटीच्या सुमारे 9 हजार बस 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी आरक्षित केल्या आहेत.
19 Nov 2024, 08:04 वाजता
मुंबईतलं मतदान वाढणार? इतके मुंबईकर मतदानासाठी पात्र
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत तब्बल 2 लाख 91 हजार 87 मतदार वाढले आहेत. मुंबईत यंदा 1 कोटी 2 लाखाहून अधिक मतदार आपले मत नोंदवणार आहेत. मतदारांची संख्या वाढली असली तरी मतदानाचा टक्का वाढवण्यात प्रशासनाला यश येणार का हे मात्र मतदानाच्या दिवशीच समजू शकणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत सुमारे 47 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाचा टक्का वाढणार का याबाबत उत्सुकता आहे.
19 Nov 2024, 08:01 वाजता
मुंबईत थंडीची चाहूल! पारा घसरण्याचे संकेत
मुंबई शहर, तसेच उपनगरांत पहाटे किंचीतसा गारवा असला तरी तापमान हळूहळू वाढत आहे. किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवले जात आहे. हवामान विभागाच्या कुलाबा आणि सांताक्रूझ केंद्रांत सोमवारी कमाल तापमान सरासरी दोन अंशाहून अधिक होते. याचबरोबर कुलाबा येथील किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले गेले. मुंबईच्या किमान तापमानात दोन दिवसांनी घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या कालावधीत किमान तापमान १८ – २० अंश सेल्सिअस दरम्यान राहील. त्यानंतर पुन्हा किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
19 Nov 2024, 08:00 वाजता
ठाकरे कुटुंब आज तुळजापूरमध्ये
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सहकुटुंब तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी तुळजापूरचा दौरा करणार आहेत.
- ‹ previous
- 1
- 2
- 3
- 4