Maharashtra Breaking News LIVE UPDATES : राज्यातून आजपर्यंत 3259 उमेदवारांचे 4426 नामनिर्देशन पत्र दाखल

Maharashtra Breaking News LIVE UPDATES : महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींना आता वेग आला असून, आजचा दिवसही अनेक बदलांचा आणि घडामोडींचा आहे...   

Maharashtra Breaking News LIVE UPDATES : राज्यातून आजपर्यंत 3259 उमेदवारांचे 4426 नामनिर्देशन पत्र दाखल

Maharashtra Breaking News LIVE UPDATES : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नेतेमंडळीच्या प्रतिक्रिया आणि त्यांचे निर्णय या साऱ्याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्याच्या राजकीय पटलावर नेमके कोणते बदल होतात आणि कोणता पक्ष या बदलांतून तरुन पुढे जातो यासंदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर... 

 

28 Oct 2024, 21:52 वाजता

राज्यातून आजपर्यंत 3259 उमेदवारांचे 4426 नामनिर्देशन पत्र दाखल

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ३ हजार २५९ उमेदवारांचे ४ हजार ४२६ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.  नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून मंगळवार, दि. २९ ऑक्टोबर ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

28 Oct 2024, 21:48 वाजता

आमच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास राणे जबाबदार - राजन तेली

माझ्या कुटुंबीयांच्या, कार्यकर्त्यांच्या किंवा माझ्या जीवितदास धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नारायण राणे यांची राहील असा इशारा आज पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन तेली यांनी दिलाय. कोकणातील प्रत्येक निवडणुकीत शिवसेना विरुद्ध नारायण राणे असे समीकरण पाहायला मिळतं आणि निवडणुकीत दहशतवादाचा मुद्दा सुद्धा समोर येतो आगामी विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजन तेलीनी आपल्या जीवितास धोका निर्माण झाल्यास राणे जबाबदार राहतील असं वक्तव्य करून पुन्हा एकदा या निवडणुकीत ट्विस्ट निर्माण केला आहे. आपण यापूर्वी अशा पद्धतीचा प्रतिज्ञापत्र सादर केलेलं होतं मी माझ्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तेच प्रतिज्ञापत्र ग्राह्य राहील का याची विचारणा करून ते ग्राह्य नसेल तर पुन्हा प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे अशी माहिती सुद्धा राजन तेली यांनी यावेळी दिली.

28 Oct 2024, 21:46 वाजता

आठवले गटाला मुंबईत दोन जागा

महायुतीमध्ये घटपक्ष असलेल्या  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला मुंबईतील धारावी आणि कालिना हे दोन मतदार संघ देण्यात आले आहेत तसेच महायुती ची सत्त्ता आल्यानंतर एक विधानपरिषद सदस्यत्व आणि राज्यात एक कॅबिनेट मंत्री पद तसेच 4 महामंडळ अध्यक्ष पदे आणि महामंडळ संचालक पदे  जिल्हा तालुका शासकीय कमिटी सदस्य पदे तसेच महापालिका जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन पक्षाला जागा देण्याचे महायुती द्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस आश्वासन दीले आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी;  दलितांच्या विकासासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी नाराजी बाजूला सारून नव्या दमाने भाजप शिवसेना रिपाइं राष्ट्रवादी महायुती ला विजयी करण्यासाठी प्रचाराला लागावे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.

28 Oct 2024, 20:15 वाजता

आम्ही बहिण भावांनी 12 वर्ष प्रारब्ध भोगला- धनंजय मुंडे 

एकमेकांचा राजकीय विरोध आत्ताच काढून टाका. आमच्या बहिण भावाचा राजकीय विरोध होता. 2019 ची निवडणूक झाली आणि महायुती झाली तेव्हा पुन्हा राजकारणात एकत्र कसे यायचं हा सर्वांनाच मोठा प्रश्न पडला होता. आम्ही बहिण भावांनी 12 वर्ष प्रारब्ध भोगला आणि नियतीने मान्य केलं आणि आम्हाला नियतीनेच एकत्र केल्याची प्रतिक्रिया कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी अहमदपूर बोलताना दिली आहे. आज अहमदपूरमध्ये महायुतीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे हेही उपस्थित होते.

28 Oct 2024, 20:05 वाजता

मित्रपक्ष कोणत्या जागेवरुन लढणार? भाजपने केले जाहीर 

भाजपकडून मित्र पक्षांना देण्यात येणाऱ्या जागा जाहीर केल्या आहेत. बडनेरामध्ये युवा स्वाभिमान पार्टीकडून रवी राणा, गंगाखेडमधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे, कलिनाची जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटासाठी देण्यात आली आहे. तर शाहूवाडीची जागा जन सुराज्य शक्ती पक्षासाठी देण्यात आली आहे.

28 Oct 2024, 18:52 वाजता

मविआत समसमान फॉर्म्युला मोडीत

महाविकास आघाडीत काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचं स्पष्ट होऊ लागलंय. काँग्रेसनं आतापर्यंत 99 जागांवर उमेदवार जाहीर केलेत. राहुल गांधींनी दिल्लीतल्या बैठकीत जागावाटपावर नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसच्या वाट्याच्या जागा वाढल्या का अशी चर्चा सुरु झालीय. काँग्रेसनं 99 जागा जाहीर करुन 'आम्ही तिळे' हा समसमान फॉर्म्युला मोडीत काढलाय.

28 Oct 2024, 18:48 वाजता

पिंपरी चिंचवडमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल...!

पिंपरी चिंचवड शहरात येणाऱ्या पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात विविध उमेदवारांनी अर्ज दाखल केले. चिंचवड मध्ये महायुतीचे भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या नाना काटे यांनीही बंडखोरी करत चिंचवड विधानसभा मतदारसंघात अपक्ष अर्ज दाखल केला. चिंचवड मधूनच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या भाऊसाहेब भोईर यांनीही बंडखोरी करत अर्ज दाखल केला. पिंपरीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार अण्णा बनसोडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. भोसरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

28 Oct 2024, 18:47 वाजता

वंचितच्या उमेदवार शमीभा पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज 

जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी कडून शामीभा पाटील यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच तृतीय पंथी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आला असून शमीभा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रस्थापितांचे मोठे आवाहन समोर असून देखील रावेर मतदार संघातील जनता एका तृतीयपंथी उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपला विजय होईल असा विश्वास शमीभा पाटील यांनी व्यक्त केला आहे.

28 Oct 2024, 16:47 वाजता

भाजपाच्या माजी खासदार हिना गावित यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज

लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष आणि भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना शिंदे गटाने विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजप या जागेसाठी अजूनही आग्रही आहे. गेल्या सात वेळेपासून आमदार असलेल्या काँग्रेसचे के सी पाडवी यांचा पराजय करण्यासाठी, हिना गावित मैदानात उतरल्या आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघांमध्ये भाजपाला चांगले मतदान मिळाले होते, या मतदानाच्या जोरावर भाजपाचा विजय इथे निश्चित असल्याचं खासदार हिना गावित या सांगत आहेत. मात्र या ठिकाणी शिवसेना जागा सोडायला तयार नाही. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये शिवसेना नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

28 Oct 2024, 14:15 वाजता

अमित ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज 

मनसेचे उमेदवार अमित ठाकरे माहिममधून निवडणूक रिंगणात उतरलेत. त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. याआधी अमित ठाकरेंनी पत्नीसोबत देवदर्शन केलं. दादरच्या शिवाजी पार्कात बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला भेट देत अभिवादन केलं. त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन आंबेडकरांना अभिवादन केलं. तसंच तिथल्या समुद्रकिना-याची पाहणी केली. त्यानंतर अनवाणी पायाने जात सिद्धीविनायकाच्या चरणी नतमस्तक झालेत.