Maharashtra Breaking News Live Updates : आझाद मैदानावर शपथविधीच्या तयारीला सुरुवात, एकूण 3 स्टेज उभारणार

Maharashtra Breaking News Live Updates : राज्यात राजकीय खलबतं, सामान्यांच्या जीवनावर कसा होणार परिणाम? वर्षातील शेवटच्या महिन्याची सुरुवात नेमकी कशी? पाहा...   

Maharashtra Breaking News Live Updates : आझाद मैदानावर शपथविधीच्या तयारीला सुरुवात, एकूण 3 स्टेज उभारणार

Maharashtra Breaking News Live Updates : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता उत्सुकता आहे ती म्हणजे सत्तास्थापनेची. याच सत्तास्थापनेपूर्वी राज्यात राजकीय नाट्याचे कैक अंक पाहायला मिळाले. त्यात आता पुढचा अंक कोणता आणि राज्यातील इतर कोणत्या घडामोडी सामान्यांचं लक्ष वेधणार? पाहा सर्व Live Updates...

2 Dec 2024, 08:18 वाजता

मुख्यमंत्रीपद नव्हे, तर 'या' जबाबदारीसाठी शिंदेंची भाजपसोबत वाटाघाटी - सूत्र 

भाजपप्रणित महायुतीला भरभक्कम बहुमत मिळून आठवडा उलटून गेला तरी खातेवाटपावरून निर्माण झालेला तिढा अद्यापही कायम आहे. मुख्यमंत्री भाजपचा होणार हे स्पष्ट झाल्यावर सरकारमध्ये क्रमांक दोनची जागा पटवण्यासाठी शिंदे भाजपसोबत वाटाघाटी करत आहेत. गृहमंत्री पदासह नगरविकास आणि इतर मलईदार खाते पदरात पाडून सरकार आणि महायुतीत आपलं महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी शिंदे प्रयत्न करत आहेत. पण गृहखाते सोडण्यास भाजप तयार नसल्याने हा पेच कसा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2 Dec 2024, 08:17 वाजता

मोदींचा चेहरा बघा, महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये - प्रणिती शिंदे 

खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधानांविषयी नाराजीचा सूर आळवला आहे. 'ही निवडणूक सरळ नव्हतीच, काही गोष्टीमध्ये त्यांनी षडयंत्र केलं. हे लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक नाही, ही तत्वाची लढाई नव्हती, तरी तुम्ही लढलात, तुम्ही टिकलात त्या बद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. cwc च्या मिटिंग मध्ये राहुल गांधी म्हणाले आपण जेव्हा निवडणूक जिंकतो तेव्हा चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरल्यावर दुःख असतं. पण आपण ही निवडणूक हरलेलो नाही, आपला विजयच झालेला आहे. तुम्ही मोदींचा चेहरा बघा, महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये. कारण ते मागच्या रस्त्याने येउन, evm मॅन्यूपुलेट करून 133 जवळपास पोहोचलेत, त्यामुळेच भाजपच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही तुम्ही निरीक्षण करून बघा', असं त्या म्हणाल्या. 

 

2 Dec 2024, 08:13 वाजता

राहुल गांधी हाजीर हो... 

राहुल गांधींना आज पुणे सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केले होते, ज्यानंतर सात्यकी सावरकरांकडून मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. आज यावर पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

2 Dec 2024, 07:50 वाजता

विनाहेल्मेट महामार्गावर जाणाऱ्यांवर कठोर कारवाई 

बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत केलेल्या वाढीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. दंडाच्या नव्या नियमानुसार गाडी चालविणारा चालक आणि मागे बसलेला सहप्रवासी या दोघांकडे हेल्मेट नसल्यास एक हजार रुपये दंड द्यावा लागणार आहे.

2 Dec 2024, 07:44 वाजता

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा.... 

श्रीलंकेत उत्पादित होणारा कांदा संपुष्टात आल्याने भारतातून कांदा मागवण्यासाठी श्रीलंका सरकारने आयात शुल्कात 20 टक्के कपात केली आहे. थोडक्यात भारतीय निर्यातदारांना आता केवळ दहा टक्के निर्यात शुल्क द्यावे लागणार आहे. ज्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. देशातून दरवर्षी साधारणतः 25 लाख टन कांद्याची विविध देशांत निर्यात होते. यात एकट्या श्रीलंकेचा वाटा नऊ टक्के आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क
अवघे 20 टक्के असल्याने निर्यातदारांना खुल्या पद्धतीने व्यापार करणे शक्य होत आहे.

2 Dec 2024, 07:32 वाजता

दमदार पावसामुळे राज्यात 35 लाख हेक्टरवर पेरणी

राज्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे गतवर्षपिक्षा रब्बी हंगामात पेरणीची सुमारे दीडपटीने वाढ झाली आहे. त्यात ज्वारी, गहू, मकाच्या पेरणीच्या वाढीबरोबरच यंदा तेलबियांच्या पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे रब्बी हंगामाचे सरासरी असणारे 54 लाख हेक्टर क्षेत्र वाढून 60 लाख हेक्टरवर पेरण्या होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

2 Dec 2024, 07:31 वाजता

रोहित पवारांनी शपथविधीवरून महायुतीला डिवचलं

रोहित पवारांनी शपथविधीवरून महायुतीला डिवचलंय. महायुतीला बहुमत मिळाल्यानं, 26 तारखेलाच सरकार स्थापन केलं पाहिजे होतं. मात्र, लग्नाची तारीख जवळ अन् नवरदेव हुंड्यासाठी रुसला, अशी टीका रोहित पवारांनी केलीये.

 

2 Dec 2024, 07:29 वाजता

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय 

6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त असंख्य अनुयायी मुंबईत दाखल होतील. तेव्हा होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वने काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 2 ते 9 डिसेंबर या कालावधीत ही बंदी लागू असणार आहे. (Mumbai Local Train) 

हेसुद्धा वाचा : Mumbai Local Train: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय; मध्य रेल्वेच्या काही स्थानकांत...

 

 

2 Dec 2024, 07:27 वाजता

मुख्यमंत्रीपदी फडणवीसच; भाजप नेत्याचा दावा

पीटीआयनं भाजप नेत्यांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून, त्यांच्यावर पुढील दोन दिवसांमध्ये भाजपच्या संभाव्य बैठकीमध्ये विधीमंडळ पक्षनेतेपदासंदर्भातही मोठा निर्णय होणार असल्याचं म्हटलं जात आहे. रविवारी रात्री भाजप नेत्यानं यासंदर्भातील माहिती वृत्तसंस्थेला दिली. 

2 Dec 2024, 06:33 वाजता

सरकार स्थापन करताना गावी जायचं नाही का? - एकनाथ शिंदे 

जनतेच्या मनातलं सरकार स्थापन होणार असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. तिघे एकत्र बसून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिपदांबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती शिंदेंनी दिली. सरकार स्थापन करताना गावी जायचं नाही का? असा सवाल करत शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला.