Mahayuti Oath Ceremony: महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मुंबईतल्या आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा होणार आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्री कोण हा प्रश्न अनुत्तरितच आहे. महायुतीच्या नव्या सरकारच्या शपथविधीचा सस्पेन्स चंद्रशेखर बावनकुळेंनी संपवला. 5 डिसेंबरला मुंबईतल्या आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी होणार असल्याचं बावनकुळेंनी जाहीर केलं. शपथविधी कधी होणार याचं उत्तर बावनकुळेंनी दिलं असलं तरी मुख्यमंत्री कोण होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. निकाल लागल्यापासून मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांना उधाण आलंय.
भाजपच्या मुख्यमंत्र्याला आमचा पाठिंबा असेल असं राष्ट्रवादीनं आधीच जाहीर केलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला. त्यानंतर दिल्लीत महायुतीची मोठी खलबतं झाली. आता अखेर भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचं निश्चित मानलं जातंय. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव फिक्स असल्याची चर्चा आहे. भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम ठेवलाय. यावरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपसह महायुतीवर जोरदार निशाणा साधलाय.
मुख्यमंत्री ठरवता न येणं आणि निकालानंतर आठवडाभराहून अधिक काळ सरकार स्थापन करता न येणं, हा महाराष्ट्रासह निवडणूक आयोगाचा अपमान आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी टीका केलीय.
मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. मात्र आमचं सर्व काही ठरलेलं आहे. त्यावर आमच्या बॉसचा शिक्का बसला की सगळं काही समजेल, असं स्पष्टीकरण भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिलंय.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालंय. एकट्या भाजपनं 132 जागा मिळवत महाराष्ट्रात मोठं यश मिळवलं. मात्र भाजपनं अद्याप विधीमंडळ नेत्याची नियुक्ती केलेली नाही. त्यावरूनही विरोधकांनी हल्लाबोल केलाय. आता महायुतीच्या शपथविधीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शपथविधीचा 5 डिसेंबरचा मुहूर्त ठरलाय मात्र अद्यापही मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार, हे गुलदस्त्यातच आहे.
26 तारखेला विधानसभेची मुदत संपलेली आहे. नवीन विधानसभा, नवीन सरकार अस्तित्वात येणे हे घटनेनुसार आवश्यक होतं. त्यांचे भाडोत्री पंडित काहीही कागदपत्र आणून दाखवतील. आम्ही जर असतो तर एवढ्याला राष्ट्रपती लागवड लावली असती, असे ते म्हणाले. अद्याप कोणीही सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निकाल लागून 10 दिवस होऊन गेले. एवढ बहुमत आहे तर सरकार स्थापनेचा दावा केला पाहिजे होता. अद्याप कोणीही सरकार स्थापनेच्या दावा का केला नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. मुख्यमंत्री कोण? भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण? या संदर्भात निर्णय झाला नाही. इतका मोठा पक्ष इतका मोठा नेते इतकं मोठ्या बहुमत तरी विधिमंडळ पक्षाचा नेता हे अद्याप यातून निवडू शकले नसल्याचे ते म्हणाले.