Breaking News Live Updates: स्पाइसजेटच्या महिला कर्मचाऱ्याने CISF जवानाला मारली थप्पड

Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस विधानसभेच्या अधिवेशनामुळे गाजण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे देशभरातील वेगवेगळ्या घडामोडींसहीत परदेशातील घडामोडींवरही या ब्लॉगच्या माध्यमातून आपलं लक्ष राहणार आहे. जाणून घ्या क्षणोक्षणाच्या अपडेट्स...

Breaking News Live Updates: स्पाइसजेटच्या महिला कर्मचाऱ्याने CISF जवानाला मारली थप्पड

Maharashtra Breaking News Today: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाबरोबरच वरळीमधील हिट अँड रन प्रकरण आजही गाजण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये आजही तिव्र ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये पावसाने उसंत घेतली असली तरी देशातील अनेक भागांमध्ये पाऊस कोसळतोय. या आणि अशाच सर्व बातम्यांसंदर्भातील अपडेट्स आपण या ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहेत. क्षणोक्षणाच्या लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा.

11 Jul 2024, 11:10 वाजता

राहुल गांधी चालतच वारीमध्ये सहभागी होतील : पटोले

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होण्यासंदर्भातील अजून कुठलाही कार्यक्रम आमच्यापर्यंत आलेला नाही. जर आले तर वारकरी प्रथेप्रमाणे ते वारीत चालतच सहभागी होतील. त्यांना चालायची सवय आहे, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. राहुल गांधी 14 जुलै रोजी वारीत सहभागी होतील असं सांगण्यात आलं आहे.

 

11 Jul 2024, 11:04 वाजता

राज्य सरकारने लोकशाहीचा खून केला : पटोले

"काल राज्य सरकारने विधासभेत लोकशाहीचा खून केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही," अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे. "मराठा आणि ओबीसी आरक्षण चे सरकारच्या अधिकारात आहे, देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला आरक्षणाचा गाजर दाखवलं होतं. ते केंद्रात आणि राज्यात पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे, बहुमत त्यांच्याकडे आहे. स्वतःच्याच आमदारांच्या हाताने सहभागृहांमध्ये गोंधळ करायचा आणि आरोप विरोधकांवर टाकायचा," अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.  

11 Jul 2024, 09:33 वाजता

वादग्रस्त IAS अधिकाऱ्याचं ते प्रमाणपत्रंही खोटं?

दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (IBSNAA) ने डॉ. पूजा खेडकर यांच्या वादग्रस्त ओबीसी जात प्रमाणपत्र प्रकरणाबाबत कारवाई सुरू केली आहे.  यासोबतच कॅटने तिच्या विरोधात तक्रार केल्यानंतरही पूजा खेडकर यांनी सहा वेळा वैद्यकीय चाचणी देण्यास नकार दिला होता.  यासंदर्भात अहवालही मागविण्यात येणार आहे. 

11 Jul 2024, 09:32 वाजता

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीत बदल

मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून तीन दिवस चार तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. कोलाडजवळ पुई इथं म्हैसदारा नदीवर नवीन पुलाचा कामासाठी गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 असे दररोज 4 तास हे काम चालणार आहे. महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे.  प्रवाशांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. कोकणात येणारी वाकण-पाली-माणगाव मार्गे तर मुंबईकडे जाणारी वाहतूक कोलाड-रोहा-भिसे खिंड मार्गे नागोठणे अशी वळवण्यात आली आहे. 

11 Jul 2024, 09:28 वाजता

मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, राज्यात मोसमी पावसाला पोषक हवामान आहे. किनारपट्टीवर अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

11 Jul 2024, 09:27 वाजता

किनारपट्टी, पश्चिम घाट परिसरात उद्यापासून 3 दिवस पावसाचा जोर

किनारपट्टीसह पश्चिम घाट आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपासून (12 जुलैपासून) पुढील तीन दिवस हवामान विभागाने किनारपट्टीसह पुणे, सातारा जिल्ह्यांना नारंगी इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील बाष्पयुक्त हवा वेगाने किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भ आणि विदर्भाला जोडून असलेल्या मराठवाड्याला पिवळा इशारा देण्यात आला असून, तिथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

11 Jul 2024, 09:25 वाजता

भाजपाची आज महत्त्वाची बैठक

भाजपा महाराष्ट्र कोअर कमिटीची आज सकाळी 10 वाजता बैठक पार पडणार आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात ही बैठक होणार असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, महाराष्ट्र भाजपा प्रभारी भूपेंद्र यादव बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला जाणार असून विधान परिषदेच्या निवडणूकीवर  देखील चर्चा होणार असल्याचे समजते.

11 Jul 2024, 09:23 वाजता

अदानींविरोधात काँग्रेसचं आंदोलन

वाढत्या वीज बिलाच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने आदानींच्या मुख्य कार्यालयावर आज दुपारी मोर्चा नेला जाणार आहे.

11 Jul 2024, 09:23 वाजता

कोस्टल रोडला साडेतीन किमीचा टप्पा आज सुरु होणार

मुंबईमधील कोस्टल रोडचा हजी आली ते वरळीचा खान अब्दुल गफार खान पर्यंतचा उत्तर दिशेने जाणारा साडेतीन किलोमीटरच्या मार्गीका गुरुवार 11 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे.

11 Jul 2024, 09:21 वाजता

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुतेसाठी रवाना

तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बरड इथला मुक्काम आटोपून पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाली. धर्मपुरी इथे दुपारचा विसावा घेऊन माऊलींची पालखी नातेपुते इथे दाखल होईल. आज नातेपुते इथं माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे