Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.
18 Sep 2024, 11:27 वाजता
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीलं आहे. यावेळी त्यांनी मोदींना त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या मात्र या पत्रात त्यांनी राहुल गांधींविरोधात द्वेषपूर्ण भाषणावर चिंताही व्यक्त केली आहे.
18 Sep 2024, 10:41 वाजता
वादग्रस्त विधान भोवणार, संजय गायकवाड यांच्या विरोधात दिल्लीत तक्रार
आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेसनं दिल्लीतील तुघलक रोड पोलिसात तक्रार दिली आहे. केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू तरविंदर मारवाह यांच्यासह संजय गायकवाडांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
18 Sep 2024, 10:37 वाजता
लालबागच्या राजाचे पार पडले विसर्जन
तब्बल 24 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन झालं आहे. गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे विसर्जन
18 Sep 2024, 10:20 वाजता
पूर्व नागपूर मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
भाजपसाठी सुरक्षित मानल्या जाणा-या पूर्व नागपुर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आभा पांडे यांनी दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारालाही त्यांनी सुरुवात केली आहे. आता अजित पवारांनी सांगीतलं तरी माघार घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
18 Sep 2024, 08:35 वाजता
राहुल गांधींची जीभ छाटू नये, त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे; शिंदेंच्या आमदारानंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांचे वादग्रस्त वक्तव्य
बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाखाचे बक्षीस देणार असं वादग्रस्त विधान ताज असतानाच आता भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी देखील राहुल गांधी यांच्या यासंदर्भात एक वादग्रस्त केलं आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाहीये. परंतु राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे. विदेशात जाऊन वात्रटासारखं कोणी बोलत असेल तर त्यांची ''''जीभ छाटू नये जिभेला चटके मात्र दिले पाहिजे'''' अशा लोकांना जिभेला चटके देणे आवश्यक आहे. अशी टिका अनिल बोंडे यांनी केली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राहुल गांधी, ज्ञानेश महाराव असो अथवा श्याम मानव असोत असे म्हणत भाजप खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी ज्ञानेश महाराव श्याम मानव यांच्यावरही टीका केली आहे. भारतामधील बहुसंख्यांकांच्या भावना जे दुखावतात त्या लोकांना किमान जाणीव तरी करून द्यायला हवी म्हणून ''''जीभ छाटू नये तर जिभेला चटके'''' मात्र निश्चितच दिले पाहिजे असा पुनरउल्लेख सुद्धा डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.
18 Sep 2024, 08:34 वाजता
अमरावती MIDCमध्ये ऑईल रिफायनरीला भीषण आग लागली आहे. अमरावती-बडनेरा मार्गावरील जुन्या MIDCमध्ये ही आगीची घटना घडली आहे. MIDCतील राम इडस्ट्रीज या ऑइल रिफायनरीमध्ये ही आग लागली आहे. पहाटे सहाच्या सुमारास कंपनीला आग लागली. त्यानंतर आगीनं संपूर्ण कंपनीला विळख्यात घेतलं. अग्निशमन दलाचे 6 बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
18 Sep 2024, 08:27 वाजता
अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी
अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी, अशी आग्रहाची मागणी मनसे नेत्यांनी केली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मनसे नेत्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, या नेत्यांच्या मागणीवर राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्व मनसैनिकांच लक्ष लागलं आहे.
18 Sep 2024, 08:05 वाजता
अजित पवारांनी बोलावली बैठक
आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट महायुतीत 80 जागा लढवण्यावर आग्रही असल्याची माहिती सूत्रानं दिली आहे. अजित पवार गटाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. बैठकीत विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाणारेय. जागा वाटपाबाबत महायुतीत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आमदारांसोबत चर्चा करणार आहेत. आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती अजित पवार जाणून घेणार असल्याची माहितीही सूत्रानं दिलीय. तर अजित पवार गटाला 40 जागा मिळतील, प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.
18 Sep 2024, 08:03 वाजता
संजय पाटलांचा विशाल पाटलांवर हल्लाबोल
सांगलीचे खासदार विशाल पाटील अपरिपक्व माणूस, अशा शब्दांत माजी खासदार संजयकाका पाटलांनी विशाल पाटलांवर हल्लाबोल केला आहे. पद आणि प्रतिष्ठा मिळाल्यावर माणूस बेफाम होतो, तसं विशाल पाटील बेफाम झालेत. ते सर्वांना पाठिंबा देत सुटलेत, अशी टीका संजयकाका यांनी केली आहे.
18 Sep 2024, 07:58 वाजता
गणेश विसर्जनाला गेलेला तरुण बुडाला
पुण्याच्या इंदापूरमध्ये गणेश विसर्जन करताना एक जण बुडाल्याची घटना घडली आहे. नीरा नदीमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेला 16 वर्षीय युवक बुडालाय आहे. अनिकेत कुलकर्णी असं या युवकाचं नाव आहे. दरम्यान प्रशासनाकडून त्याचा शोध सुरू आहे.