Breaking News LIVE Updates: सांगलीत तासगावमध्ये आजी-माजी खासदारांमध्ये भरसभेत जुंपली

Maharashtra Breaking News LIVE Updates: राजकारणाबरोबरच दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा अगदी संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या, या एकाच ठिकाणी...

Breaking News LIVE Updates: सांगलीत तासगावमध्ये आजी-माजी खासदारांमध्ये भरसभेत जुंपली

7 Oct 2024, 10:51 वाजता

'त्या' 12 आमदारांसंदर्भातील याचिकेवर आज सुनावणी

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना यादी देण्यात आली होती. कोश्यारी यांनी या नियुक्त्या अडवून धरल्या होत्या. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

7 Oct 2024, 10:49 वाजता

पोलीस महासंचालक मुख्यमंत्र्याच्या भेटीला

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रश्मी शुक्ला महाराष्ट्र सदनात पोहोचल्या आहेत.

7 Oct 2024, 09:50 वाजता

रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील 12 वर्षीय मुलीची आत्महत्या

पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरीमध्ये 12 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलीच्या वडीलाच्या तक्रारीवरून क्षितिज लक्ष्मण पराड आणि तेजस पांडुरंग पठारे या दोन आरोपींना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती काल पालकांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

7 Oct 2024, 09:49 वाजता

12 मुंबईकरांनी डेंग्यूमुळे गमावला प्राण; राज्यातील मृतांची संख्या 31 वर

राज्यात गेल्या नऊ महिन्यांत डेंग्यूने 31 जणांचा बळी घेतला आहे. हा आजार 13 हजार 594 रुग्णांना झाला. हा आजार डासांमुळे होणारा असून, आपल्या आजूबाजूच्या परिसरात डासांची उत्पत्तीस्थळे असतील तर ती नष्ट केली पाहिजेत, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. विशेष म्हणजे, राज्याच्या रुग्णांच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक 3435 रुग्ण आणि 12 मृत्यू हे एकट्या मुंबईतील आहेत.

7 Oct 2024, 09:47 वाजता

एसटीच्या ताफ्यात दाखल होणार 25000 नव्या बस

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात 25000 नव्या डिझेल लालपरी बस पुढच्या वर्षी दाखल होतील, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांनी दिली. तसेच, एसटीला सतत नफ्यात ठेवण्यासाठी एनएफबीआरसारख्या इतर पर्यायी माध्यमांतून महसूल मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

7 Oct 2024, 08:24 वाजता

माहीममधील रहिवासी इमारतीला आग

माहीम परिसरात रहिवासी इमारतीला आग लागली आहे. मोईन हाइट्स नावाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग लागली असून इमारतीत काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाल्यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.

7 Oct 2024, 08:22 वाजता

साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते आज होणार आहे

7 Oct 2024, 08:20 वाजता

राज ठाकरे आज पुण्यात; मॅरेथॉन बैठका

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात पुण्यात अनेक बैठका होणार आहेत. मनसेच्या पश्चिम विभागाची बैठक  सकाळी 10 पासून सुरू होणार आहे. पश्चिम विभागात असणाऱ्या सर्व जिल्ह्यातील मुख्य नेते, पदाधिकारी, उपस्थितीत राहणार आहेत.  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची आजची महत्त्वाची बैठक असणार आहे.

7 Oct 2024, 08:17 वाजता

बुधवारपासून राज्यभरात परतीचा पाऊस?

राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहेत. त्यामुळे बुधवारपासून (9 ऑक्टोबर) ते शनिवारपर्यंत (12 ऑक्टोबर) राज्यभरात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

7 Oct 2024, 08:15 वाजता

मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोचा आज श्रीगणेशा

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्प्याचे लोकार्पण शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर सोमवारपासून हा टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता बीकेसी मेट्रो स्थानक आणि आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावरून पहिली भुयारी मेट्रो गाडी सुटणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.