Breaking News LIVE Updates: राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या याचिकेवर सुनावणी संपली, कोर्टाने राखून ठेवला निकाल

Maharashtra Breaking News LIVE Updates: राजकारणाबरोबरच दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा अगदी संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या, या एकाच ठिकाणी...

Breaking News LIVE Updates: राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या याचिकेवर सुनावणी संपली, कोर्टाने राखून ठेवला निकाल

7 Oct 2024, 08:24 वाजता

माहीममधील रहिवासी इमारतीला आग

माहीम परिसरात रहिवासी इमारतीला आग लागली आहे. मोईन हाइट्स नावाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग लागली असून इमारतीत काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाल्यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.

7 Oct 2024, 08:22 वाजता

साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते आज होणार आहे

7 Oct 2024, 08:20 वाजता

राज ठाकरे आज पुण्यात; मॅरेथॉन बैठका

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात पुण्यात अनेक बैठका होणार आहेत. मनसेच्या पश्चिम विभागाची बैठक  सकाळी 10 पासून सुरू होणार आहे. पश्चिम विभागात असणाऱ्या सर्व जिल्ह्यातील मुख्य नेते, पदाधिकारी, उपस्थितीत राहणार आहेत.  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची आजची महत्त्वाची बैठक असणार आहे.

7 Oct 2024, 08:17 वाजता

बुधवारपासून राज्यभरात परतीचा पाऊस?

राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहेत. त्यामुळे बुधवारपासून (9 ऑक्टोबर) ते शनिवारपर्यंत (12 ऑक्टोबर) राज्यभरात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

7 Oct 2024, 08:15 वाजता

मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोचा आज श्रीगणेशा

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्प्याचे लोकार्पण शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर सोमवारपासून हा टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता बीकेसी मेट्रो स्थानक आणि आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावरून पहिली भुयारी मेट्रो गाडी सुटणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.

7 Oct 2024, 08:14 वाजता

अजित पवार आज बारामतीत; बिल्डरांना करणार मार्गदर्शन

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता राजमाता जिजाऊ सभागृहात व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं असून रात्री आठ वाजता बारामती क्लबमध्ये बिल्डर असोसिएशनचा मेळाव्यास उपमुख्यमंत्री उपस्थीत राहून मार्गदर्शन करणार आहेत. 

7 Oct 2024, 08:11 वाजता

आज हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

इंदापुरात आज शरद पवार यांचा दौरा आहे. सकाळी 11 वाजता हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते -पाटील, उपस्थित राहणार असल्याचे समजते.

7 Oct 2024, 08:09 वाजता

महाविकास आघाडीच्या जागावाटपावर होणार शिक्कामोर्तब?

महाविकास आघाडीची आज जागावाटपसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. दुपारी 2 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक होईल.