लॉकडाऊन : देशातील प्रवासी रेल्वे सेवा १४ एप्रिलपर्यंत बंद

देशातील रेल्वे सेवा १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे.  

Updated: Mar 25, 2020, 09:42 PM IST
लॉकडाऊन : देशातील प्रवासी रेल्वे सेवा १४ एप्रिलपर्यंत बंद  title=
छाया - अमित जोशी, प्रतिनिधी

मुंबई  : देशातील रेल्वे सेवा १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. लॉकडाऊनमुळे रेल्वे प्रशासनानेही मेल, एक्स्प्रेस आणि लोकल रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, प्रवासी वाहतूक बंद असली, तरी देशातील मालगाड्या सुरु राहणार आहेत. लोकल बंद असल्यामुळे ज्या प्रवाशांनी ऑनलाईन तिकीटे बुक केलेली आहेत. त्यांनी ती रद्द करु नये. रेल्वे प्रशासनाकडून त्यांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत करण्यात येणार आहेत, असेही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यापूर्वी देशातील प्रवासी रेल्वेसेवा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. मात्र, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रेल्वे प्रशासनानेही रेल्वेसेवा १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. 

मध्य रेल्वे-कोविड-१९ मुळे रेल्वेने देशभरातील सर्व प्रवासी रेल्वे सेवा बंद केल्या आहेत.  तथापि, दूध, भाजीपाला, अन्नधान्य इत्यादी वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मालवाहतूक गाड्या (  Goods train) चालवल्या जात आहेत. मध्य रेल्वेला सर्वसाधारणपणे देशातील आणि विशेषतः मुंबईच्या गरजा भागवण्यासाठी २४/७ काम करावे लागेल.या कठीण काळात आम्हाला महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी लागेल आणि फ्रेट गाड्यांची वेगवान वाहतूक सुनिश्चित करण्यात मदत करावी लागेल, अशी माहिती महाप्रबंधक संजीव मित्तल यांनी दिली.

ते असेही म्हणाले की, माननीय पंतप्रधानांनी २५.३.२०२० रोजी कोविड -१९ चा पुढील प्रसार रोखण्यासाठी २१ दिवसांच्या राष्ट्रव्यापी लॉक डाऊनची घोषणा केली तसेच    निर्देश पाळण्यासाठी  नागरिकांना हात जोडून विनंती केली आहे. श्री मित्तल यांनी सर्वांना परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्याची विनंती केली आणि ते म्हणाले की कोविड -१९ विरुद्धच्या लढाईची ही केवळ सुरुवात आहे आणि अजून बराच पल्ला गाठायचा आहे.  प्रत्येकाने स्वतःच्या  आणि त्याच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी सर्वांनी सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कर्मचार्‍यांचे मनोबल नेहमीप्रमाणेच उच्च आहे आणि प्रत्येकाने पुन्हा हे सिद्ध केले आहे की, कोणत्याही परिस्थितीत मुंबई विभाग आव्हानांना तोंड देऊ शकेल.  नियंत्रण कक्ष आणि स्टेशनवरील इतर फ्रंटलाइन कर्मचार्‍यांना चोवीस तास काम करण्यासाठी नेमण्यात आले आहे, अशी माहीती विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी सांगितले.