Palghar LokSabha : पालघरमध्ये राजेंद्र गावितांचं तिकिट निश्चित? बहुजन विकास आघाडीची शिट्टी कोण वाजवणार?

Palghar Lok Sabha 2024 : उत्तर मुंबई आणि डहाणू अशा दोन लोकसभा मतदारसंघांना तोडून 2009 च्या पुनर्रचनेत पालघर लोकसभा मतदार संघ तयार झाला. अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ... आदिवासींच्या विकासासाठी जिल्ह्याची निर्मिती झाली मात्र आदिवासी समाज मुलभूत सुविधांपासून आणि विकासापासून कोसो दूर आहे. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट

सौरभ तळेकर | Updated: Mar 24, 2024, 08:51 PM IST
Palghar LokSabha : पालघरमध्ये राजेंद्र गावितांचं तिकिट निश्चित? बहुजन विकास आघाडीची शिट्टी कोण वाजवणार? title=
Palghar LokSabha Constituency, LokSabha Elections 2024

Palghar Lok Sabha Constituency : पालघर... धरणांचा जिल्हा... सुंदर समुद्रकिना-यांचं वरदान लाभलेला ... आदिवासी आणि आगरी कोळ्यांचा जिल्हा... देशातील पहिलं अणुऊर्जा केंद्र असणारा जिल्हा... म्हणजे पालघर... विपुल निसर्गसौंदर्यांने नटलेला... घनदाट जंगलं असणारा... आदिवासी सांस्कृतिक वारसा जपणारा... ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मंदिरांचा जिल्हा म्हणजे पालघर...  मुंबईच्या जवळ असूनही अनेक समस्यांनी ग्रासलेला हा मतदारसंघ... धरणांचा जिल्हा अशी ओळख असली तरी इथलं पाणी जातं ते मुंबई आणि ठाण्याला.. पालघरच्या स्थानिक नागरिकांना मात्र पायाला बसणारे चटके सहन करत घोटभर पाण्यासाठी मैलोन मैल वाट तुडवावी लागते. अनेक गाव-पाडे आरोग्य सुविधेंपासून वंचित आहेत. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग याच पालघरमधून जातो. मात्र महामार्गासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अजून मोबदला मिळालेला नाही. त्या शिवाय बुलेट ट्रेन, मुंबई आणि वडोदरा एक्सप्रेस वे इंडस्ट्रीयल कारिडॉर, वाढवण बंदर हे महाकाय प्रकल्प याच पालघर जिल्ह्यात आहेत. 

पालघर समस्यांचं माहेरघर

आरोग्य सुविधांच्या बाबतीत अत्यंत मागासलेला जिल्हा आहे. गाव-पाड्यांसह अतिदुर्गम भागातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न देखील आहे. तर आदिवासी वस्त्यांवरचं कुपोषणाचं भयाण वास्तव पहायला मिळतं. मच्छिमार समाज मोठ्या प्रमाणात असूनही दुर्लक्षित असून तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये स्फोट, आगी लागण्याचे वारंवार प्रकार सुरू असतात. तर डहाणू-विरार रेल्वे सेवेच्या अपुऱ्या फेऱ्या आणि प्रवाशांच्या असंख्य समस्या देखील आहेत. पालघरच्या विकासासाठी आणि प्रकल्पांसाठी दोन हजार कोटींपेक्षा जास्त निधी या जिल्ह्यात आणल्याचा दावा विद्यमान खासदार राजेंद्र गावीत करतायत. तर तर दुसरीकडे विद्यमान खासदारांनी कोणताही विकास केला नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

पालघरचं राजकीय गणित

2009 मध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधवांनी विजय मिळवत पालघरचे पहिले खासदार झाले. त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपचे चिंतामण वनगा खासदार बनले. 2018 मध्ये चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित पोटनिवडणुकीत विजयी झाले. 2019 मध्ये युती असताना शिवसेनेच्या तिकिटावर राजेंद्र गावित पुन्हा निवडून आले. सध्या पालघर लोकसभा मतदारसंघात पालघर, वसई, नालासोपारा, बोईसर, डहाणु आणि विक्रमगड या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या सहापैकी एकाही जागेवर भाजपचा आमदार नाही.

बोईसर, वसई आणि नालासोपारा या तीन ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. तर विक्रमगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, डहाणूमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि पालघरमध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे, जो आता शिंदे गटात आहे. पालघरच्या लोकसभेच्या जागेवर अजून कुठल्याही राजकीय पक्षाकडून उमेदवारी घोषित झालेली नाही. शिंदे गट की भाजपाला तिकीट हा तिढा अजूनही सुटलेला नाही. तर दुसरीकडे पालघर पट्ट्यात प्रमुख प्रभाव असलेला बहुजन विकास आघाडी काय भूमिका घेणार? यावरही सर्वांचं लक्ष असेल.

पालघरचा गड सध्या महायुतीकडे असला तरी आगामी निवडणुकीत पालघरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध इथला स्थानिक पक्ष बहुजन विकास आघाडी या तिघांमध्येही जोरदार रंगत पाहायला मिळणार आहे. भौगोलिकदृष्ट्या सागरी, नागरी आणि डोंगरी अशा या मतदारसंघात तिनही पक्षांकडून सध्या जोरदार मोर्चेबांधणी पाहायला मिळतेय.