हेमंत चापुडे, शिरुर : शिरूरमध्ये लोकसभा निवडणुकीत बैलगाडा शर्यतीचा मुद्दा गाजणार आहे. शेतकऱ्यांच्या भावनेच्या मुद्यावरून येथे राजकारण रंगलं आहे. जत्रा आणि यात्रा यामध्ये बैलगाडी शर्यतीचं आकर्षण असतं. बैलगाडा घाटात मालकाचं नाव उंचावून ठेवणारी ही बैलगाडा शर्यत आता बंद पडली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील जत्रा-यात्रांमधील आनंद हरवत चालला आहे. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी बैलगाडा मालकांनी अनेकदा आंदोलनं केली. मात्र बैलगाडा शर्यतबंदीचा लढा न्यायालयात असल्याने त्यांचं आंदोलन यशस्वी ठरलेलं नाही. त्यामुळेच की काय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यतीचा हाच मुद्दा आता शिरुर मतदारसंघात भावनिक बनला आहे.
लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे प्रत्येक सभा आणि गाव भेट दौऱ्यांमध्ये बैलगाडा मालकांच्या भावनिक मुद्याला हात घालून बैलगाडा शर्यत सुरू करण्याचं आश्वासन देत आहेत.
अभिनेता असलेल्या कोल्हे यांनी या मुद्याचं राजकारण न करता मालिकेच्या माध्यमातून नागरिकांचं मनोरंजन करावं असा खोचक टोला विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लगावला आहे.
राजकारण्यांनी राजकारण करावं... मात्र दुष्काळ, गारपीट अशा विविध अस्मानी संकटात सापडलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी, त्याला घाटात नाचायला लावणारी जिव्हाळ्याची बैलगाडा शर्यत लवकर सुरू करावी अशी मागणी होते आहे.