लोकसभेत मविआ 48 पैकी 'इतक्या' जागा जिंकेल, संजय राऊत यांचं भाकित

Loksabha 2024 : देशात यंदा बदल घडणार असून यात महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका असेल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात मविआ 48 पैकी तब्बल 35 जागा जिंकेल असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.

राजीव कासले | Updated: Apr 5, 2024, 05:13 PM IST
लोकसभेत मविआ 48 पैकी 'इतक्या' जागा जिंकेल, संजय राऊत यांचं भाकित title=

Loksabha 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशात बदल घडेल आणि त्याची जबाबदारी महाराष्ट्रावर (Maharashtra) आहे. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि दिल्ली ही चार राज्य निर्णायक ठरतील. त्यात महाराष्ट्राचा वाटा निर्णायक ठरेल, महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) 48 पैकी 35 प्लस जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे, असं भाकित ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut) यांनी वर्तवलं आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभेच्या जागावाटपाता आपली भूमिका योग्यरितीने बजावली आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

युती म्हटली की एखाद दुसऱ्या जागेवरुन वाद होतो. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की हा मतदार संघ आपल्याला सुटवा असं वाटतं आणि प्रत्येकाला वाटतं की इथे आमचीची ताकद आहे. त्या कार्यकर्त्यांच्या भावनाही महत्त्वाच्या आहेत. 
शिवसेनेसाठी मुंबई महत्त्वाची आहे, शिवसेना मुंबईत चार जागा लढणार आहे असं सांगत संजय राऊत यांनी या जागा आपल्याच असल्याचं ठणकावलं आहे. 

सांगलीच्या जागेवरुनही महाविकास आघाडीत मतभेद कायम आहेत. यावर बोलताना सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना होत्या, पण त्या त्यांनी रद्द केल्यात. त्यांच्या भावानांचा आम्ही आदर करतो. 
कोल्हापूरची जागा शिवसेनेने काँग्रेसला दिली आहे. कारण तिथे शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामटेक आणि अमरावतीची जागा काँग्रेसला सोडली आहे. त्यानुसार सांगली ही शिवसेनेने लढावी अशी पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर सांगलीची जागा शिवसेना लढवणार असा निर्णय झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

सांगलीत जो विरोध होत आहे. तो एकदोन दिवसात शांत होईल. विशाल पाटील, विश्वजीत पाटील हे महत्त्वाचे कारय्कर्ते आहेत. महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना विश्वजीत कदम यांची भूमिका महत्वाची होती. उद्याच्या राजकराणात विशाल पाटील यांना महत्त्वाची भूमिका मिळेल असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

नारायण राणे यांना इशारा
दरम्यान, खासदार संजय राऊतांनी राणेंना थेट इशारा दिलाय. दोन महिन्यात आमची सत्ता येतेय. सत्ता आल्यावर नारायण राणे तिहार जेलमध्ये असतील, त्यांच्या सर्व बंद झालेल्या फाईल उघडणार असा इशारा राऊतांनी दिलाय. ठाकरे बाप-बेटे जेलमध्ये जातील अशी टीका नारायण राणेंनी केली होती, त्यावर राऊत कडाडलेत. तर राऊतांच्या टीकेला नितेश राणेंनीही प्रत्युत्तर दिलंय..