LokSabha Opinion Poll: लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. यादरम्यान Zee News आणि MATRIZE चा ओपिनियन पोल समोर आला आहे. भाजपामध्ये अनेक नवे पक्ष सामील झाल्यानंतर आणि इंडिया आघाडीची स्थापना झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे देशात पुन्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार येणार की इंडिया आघाडी धक्का देणार याकडे देशवासीयांचं लक्ष आहे. दरम्यान या ओपिनियम पोलमध्ये महाराष्ट्राबद्दल काय अंदाज वर्तवण्यात आला आहे हे जाणून घेऊयात.
या ओपिनियन पोलनुसार आजच्या घडीला लोकसभा निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात एनडीएला म्हणजेच भाजपा, शिंदे गट, अजित पवार गटाला 48 पैकी 45 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला फक्त 3 जागा मिळतील असा अंदाज आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत एनडीएच्या जागांमध्ये 7 आणि मतांमध्ये 4.6 टक्क्यांची वाढ होईल. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा 6 ने कमी होतील आणि मतांमध्ये 4.1 टक्क्यांची घट होईल.
अजित पवार गट एनडीएत सहभागी झाल्याचा लोकसभा निवडणुकीवर किती परिणाम होईल असं विचारण्यात आलं असता 28 टक्के लोकांना फार तर 32 टक्के लोकांना काही प्रमाणात असं मत नोंदवलं आहे. तर 22 टक्के लोकांनी नुकसान होईल असं म्हटलं आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामकाजावर तुमचं मत काय असं विचारण्यात आलं असता 36 टक्के लोकांनी आपण काही प्रमाणात संतृष्ट असून, कामकाज ठिकठाक असल्याचं म्हटलं आहे. तर 32 टक्के लोकांना कामकाज चांगलं असून, फार समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर 26 टक्के लोकांनी अजिबात सहमत नसल्याचं मत नोंदवलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून सर्वात चांगलं काम केल्याची पावती देण्यात आली आहे. 44 टक्के मतं एकनाथ शिंदे, 36 टक्के मतं देवेंद्र फडणवीस आणि 20 टक्के मतं उद्धव ठाकरेंना मिळाली आहेत.
DISCLAIMER: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने झी मीडिया आणि मॅट्रिझनं ओपिनियन पोल केला आहे. दोन्ही आघाडी स्थापन झाल्यानंतर आणि राज्यसभा निवडणुकीनंतर ही जनमत चाचणी घेण्यात आली आहे. हे सर्वेक्षण 5 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आले आहे. या ओपिनियन पोलमध्ये लोकसभेच्या 543 जागांवर 1 लाख 67 हजार 843 लोकांची मतं घेण्यात आली. ज्यामध्ये 87 हजार पुरुष आणि 54 हजार महिलांचा समावेश आहे. याशिवाय या ओपिनियन पोलमध्ये 27 हजार नवमतदारांची मतंही समाविष्ट करण्यात आली आहेत. ओपिनियन पोलच्या निकालांमध्ये एक ते दोन टक्क्यांचा फरक पडू शकतो. हे निवडणुकीचे निकाल नाहीत, हा फक्त ओपिनियन पोल आहे. हा ओपिनियन पोल म्हणजे कोणत्याही प्रकारे निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न नाही.