Loksabha 2024 : भाजपनं दिल्लीतून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी नवनीत राणा (Navneet Rana) यांची उमेदवारी जाहीर केली. रातोरात त्यांना भाजपात (BJP) प्रवेश देण्यात आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी संकटमोचक हनुमानाची मूर्ती देऊन राणांचं स्वागत केलं. उद्धव ठाकरेंच्या विरोधात हनुमान चालिसा आंदोलन करणाऱ्या राणांना भाजपकडून उमेदवारीचं बक्षीस मिळालं.
राज ठाकरे नवनवीत राणांचे स्टार प्रचारक?
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवनीत राणा यांच्या फेसबूक पेजवर एक पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टरवर महायुतीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा फोटोही लावण्यात आला आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे स्टार प्रचारक (Star Campaigner) असणार का याची चर्चा रंगू लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शुभेच्छा देणारी पोस्ट नवनीत राणा यांनी शेअर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह पंधरा नेत्यांचे फोटो आहेत. यात राज ठाकरे यांच्या फोटोचाही समावेश आहे. नवनीत राणा यांनी राज ठाकरेंचा पोस्टरवर फोटो लावल्याने चर्चांना उधान आलं आहे. राज ठाकरे महायुतीत सामील होणार का अशी चर्चा रंगली आहे.
ननवीत राणांच्या उमेदवारीला विरोध
दरम्यान, नवनीत राणांच्या विरोधात महायुतीतली नाराजी आणखीच वाढलीय. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूंनी (Bachhu Kadu) थेट बंडाचा झेंडा फडकवलाय. राणांना पाडणार, त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा जोरदार प्रहार कडूंनी केलाय. तर दुसरीकडं शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळांनीही (Anandrao Adsul) नाराजी व्यक्त केलीय. चोर रात्रीच्याच वेळेला येतात, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली..
अडसुळांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनी तर लोकसभेचा उमेदवारी अर्ज घेतलाय. राणांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी अडसुळांनी सुरू केल्याचं समजतंय. तसं झाल्यास राणा, काँग्रेसचे बळवंत वानखेडे विरुद्ध अपक्ष अडसूळ अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अडसूळ आणि बच्चू कडूंची समजूत काढण्याचा प्रयत्न खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. मात्र अजून तरी त्यांना यश आलेलं नाही.
नवनीत राणा विरुद्ध सर्व असंच चित्र सध्या अमरावतीत दिसतंय. मित्रपक्षांच्या नाराजीमुळं ही जागा महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते. महायुतीतल्या या भांडणाचा लाभ काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंना होणार का, यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणाराय.