टेंडर व्होटिंग म्हणजे काय रे भाऊ? तुमच्या नावावर बोगस मतदान झाल्यानंतरही करु शकता Voting

Loksabha 2024 : तमाम मतदारांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बातमी. तुमच्या नावावर जर कुणी बोगस मतदान केलं असेल तर तुमच्या मतदानाच्या अधिकारावर गंडांतर येऊ शकतं. मात्र गोंधळून जाऊ नका, पुण्याचे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याबाबतही असाच प्रकार घडला..

राजीव कासले | Updated: May 13, 2024, 08:13 PM IST
टेंडर व्होटिंग म्हणजे काय रे भाऊ? तुमच्या नावावर बोगस मतदान झाल्यानंतरही करु शकता Voting title=

Loksabha 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सूरू आहे. देशात 96 जागांवर चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. यापैकी महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश होता. पुण्यातही चौथ्या टप्प्याचं मतदान (4th Phase Voting) झालं. याच दरम्यान पुण्यातील एका घटनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे मतदानाला गेले, तेव्हा त्यांच्या नावावर आधीच कुणीतरी बोगस व्होटिंग (Bogus Voting) केल्याचं आढळलं. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांशी वाद घालून त्यांना टेंडर व्होटिंग (Tender Voting) करावं लागलं. हे टेंडर वोटींग म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.. त्यावरच एक नजर टाकूयात.

टेंडर व्होटिंग म्हणजे काय रे भाऊ? 
एखाद्या मतदाराच्या नावावर बोगस मतदान झालं तर टेंडर व्होटिंगचा अधिकार बजावता येतो. त्यासाठी विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करावी लागते. निवडणूक अधिकाऱ्याकडे 17 ब क्रमांकाचा तक्रार अर्ज करावा लागतो. 17 ब' चा अर्ज दाखल करताना मतदाराचा अंगठा घेतला जातो. बोगस मतदान झाल्याची खात्री करून मतदाराला मतपत्रिका दिली जाते. मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदानाचा हक्क बजावता येतो. मतदाराला टेंडर व्होटिंगचा अधिकार असला तरी या मताच्या मोजणीबाबत काही विशिष्ट नियम आहेत...

टेंडर व्होटिंगची मोजणी होते का?
गरज भासली तरच टेंडर व्होटिंगची मतमोजणी होते. पहिल्या दोन नंबरची मतं घेतलेल्या उमेदवारांच्या मतांमधील तफावत पाहून मोजणी केली जाते. निकालावर परिणाम करण्याइतपत अल्प तफावत असेल तरच टेंडर व्होटिंगची मोजणी होते

निवडणुकांमध्ये बोगस मतदानाच्या अनेक घटना समोर येत असतात. बोगस मतदानामुळे अनेक जण मतदानापासून वंचित राहतात.  मात्र आता तुम्हाला तुमच्या अधिकारापासून कुणीही वंचित ठेवू शकणार नाही. संविधानाने दिलेला टेंडर व्होंटिंगचा हक्क तुम्ही बजावू शकता. दुसरीकडे, जीवंत मतदारांना मतदान यादीत मृत दाखवण्याचा धक्कादायक प्रकारही पुण्यात समोर आलाय. त्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावं लागलंय. महात्मा फुले पेठमधल्या शाळा नंबर 95 मध्ये 5 मतदारांच्या बाबतीत हा प्रकार घडला. युवक क्रांती दलाने या मतदारांना मतदान करु दिलं जावं अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केलीय..

पुण्यात तिरंगी लढत
पुण्यात तिरंगी लढत आहे.. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासमोर भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांचं आव्हान आहे. 

राज्यात 52.63% मतदान
दरम्यान, राज्यात चौथ्या टप्प्यात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 52.63% मतदानाची नोंद झाली आहे. सर्वाधिक मतदान नंदुरबार मतदारसंघात 60.60% मतदान झालं. तर सर्वात कमी 43.89% मतदान पुण्यातील शिरुर मतदारसंघात झालं. जालनामध्ये 59.44 टक्के, तर पुण्यात 44.90 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.