प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खासगी कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. पवारांचा दौरा म्हटला की राजकीय चर्चा आणि पक्षांतर्गत कुरघोड्या त्यांच्या कानावर पडणार नाही असं होणार नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काय चाललंय? याचा कानोसा घेऊन नक्की चर्चा करतील. या चर्चेत प्रमुख मुद्दा असेल तो कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा... विद्यमान खासदार धनंजय महाडीक हे पक्षविरोधी करवाया करतात, असा थेट आरोप काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील राष्ट्वादीचे कार्यकर्त्यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे कार्यकर्त्यांना नेमका काय संदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तर दुसरीकडं राष्ट्रवादीच्या ताब्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा जागा वाटपात स्वाभीमानी शेतकरी संघटनेला सोडण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. यामुळे हातकणंगले मतदारसंघातील माजी खासदार माने गट नाराज झालाय. हा मतदारसंघ स्वाभिमानीला दिल्यास बंडाचा इशारा माने गटाने दिलाय.
शरद पवार हे योग्य वेळी योग्य त्या व्यक्तीचे कान टोचतात हा पुर्वानुभव अनेकांना आहे. त्यामुळंच काही महिन्यापूर्वी कोल्हापूरच्या दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांनी सावध भूमिका प्रतिक्रिया दिली होती.
शरद पवार यांच्या मनात काय चाललंय यांचा अंदाज घेणं सोप नाही याची कल्पना अनेकांना आहे. त्यात संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची नस शरद पवार यांना माहिती आहे. त्यामुळं कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेली आणि संभाव्य राजकीय कोंडी पवार अपसूक सोडवतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे पेल्यातलं वादळ ते कशाप्रकारे शमवणार, याची उत्सुकता लागलीय.