'..तर मोदी सत्तेत आल्यावरही शेअर बाजार 10-20 टक्क्यांनी घसरेल', 'मित्रपक्षांमुळे महाराष्ट्रात..'

Loksabha Election 2024 Stock Market: शेअर बाजारावर निवडणुकीच्या निकालाचा परिणाम होणार असं सांगितलं जातं आहे. मात्र भाजपाच्या विजयानंतरही शेअर बाजारामध्ये पडझड होऊ शकते असं भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 29, 2024, 11:40 AM IST
'..तर मोदी सत्तेत आल्यावरही शेअर बाजार 10-20 टक्क्यांनी घसरेल', 'मित्रपक्षांमुळे महाराष्ट्रात..' title=
शेअर बाजारासंदर्भात मोठं भाकित (प्रातिनिधिक फोटो)

Loksabha Election 2024 Stock Market: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं नाही तर शेअर बाजाराला मोठा फटका बसेल असा अंदाज यापूर्वीही अनेकांनी व्यक्त केला आहे. मात्र आता मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आलं तरी किती जागा हे सरकार मिळवणार यावरही बरंच काही अवलंबून असल्याचं सांगितलं जात आहे. गुंतवणूकदार रुचिर शर्मा यांनी, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला यंदाच्या लोकसभा निवडणुकीमद्ये 250 पेक्षा कमी जागा मिळाल्या तरी शेअर बाजारामध्ये मोठी पडझड होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे. रॉकफेलर इंटरनॅशनलच्या अध्यक्ष असलेल्या रुचिर यांनी मुंबईतील 'इंडिया टुडे'च्या 'पॉप अप कॉनक्लेव्ह' कार्यक्रमात ही शक्यता बोलून दाखवली. भाजपाला 250 पेक्षाही कमी जागा मिळाल्या तर शेअर बाजारामध्ये 10 ते 20 टक्क्यांची घसरण पाहायला मिळेल असं, रुचिर म्हणाले आहेत.

सर्वाधिक अब्जाधीश असूनही...

भारतामधील शेअर बाजार हा जगातील सर्वात महागड्या शेअर बाजारा असून त्यामुळेच परदेशी गुंतवणूकदार मोठ्याप्रमाणात भारताकडे आकर्षित होत आहेत. मात्र प्रत्यक्षात एफडीएअंतर्गत परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अधिक सुधारणेची गरज आहे. एफडीएची सध्याची अर्थव्यवस्थेमधील टक्केवारी ही जीडीपीच्या 1 टक्का इतकी आहे, असं रुचिर म्हणाले. मागील पाच वर्षांमध्ये भारतात मोठ्याप्रमाणात संपत्ती निर्माण झाली आहे. ही संपत्ती प्रामुख्याने घरगुती संपत्तीमुळे तयार झाली असून त्यामध्ये परदेशी गुंतवणुकीचा अल्प वाटा आहे, असं रुचिर म्हणाले. जगातील सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या भारतामध्ये कमाईमधील तफावत ही मोठी समस्या असल्याचं जागितक स्तरावर बोललं जातं. 

नक्की वाचा >> '2019 मध्ये शरद पवारांनीच..', उद्धव ठाकरेंचा 'मित्र' असा उल्लेख करत अमित शाहांचा खळबजनक दावा

महाराष्ट्राचं नाव घेत म्हटलं...

रुचिर यांनी केंद्र सरकारचं कौतुकही केलं आहे. सरकारला महागाईचा दर नियंत्रणात ठेवण्यात यश आल्याचं रुचिर यांचं म्हणणं आहे. मात्र रुचिर यांनी महाराष्ट्राचा उल्लेख करत भाजपाच्या मित्रपक्षांची चिंता वाढवणारं विधान केलं आहे. भाजपाला मित्रपक्षांमुळे ज्या राज्यांमध्ये फटका बसू शकतो त्यात रुचिर यांनी महाराष्ट्राचं नाव घेतलं आहे. "माझ्या प्रवासादरम्यान मला असं दिसून आलं की राज्यात दोन्ही बाजूला 50-50 जागा मिळतील. मात्र भाजपाला मित्रपक्षांमुळे फटका बसेल. आंध्र प्रेदश वगळता भाजपाचे मित्रपक्षा खास करुन बिहारमध्ये, कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वाईट कामगिरी करत आहेत. आंध्र प्रदेश वगळता सगळीकडे भाजपाचे मित्रपक्ष अडचणीत दिसत आहेत," असं रुचिर यांनी म्हटलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू यांच्यासोबतीनं भाजपा निवडणुकीच्या रिंगणात आहे.