मोदींची हवा आहे, या फुग्यात कोणी राहू नये- नवनीत राणांचा भाजपला घरचा आहेर

Navneet Rana On PM Narendra Modi:  भाजपने नवनीत राणांना उमेदवारी जाहीर केली. मात्र आता नवनीत राणा यांनी थेट नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केलं आहे. 

Updated: Apr 16, 2024, 04:22 PM IST
मोदींची हवा आहे, या फुग्यात कोणी राहू नये- नवनीत राणांचा भाजपला घरचा आहेर title=
Navneet Rana On Narendra Modi

Navneet Rana On PM Narendra Modi: अमरावतीच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आपल्या कृतीमुळे नेहमीत चर्चेत असतात. उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर येऊन हनुमान चालीसा बोलण्याचे आवाहन देणे, जात वैधता प्रकरणात अडकणे, महायुतीच्या मित्रपक्षांकडून उमेदवारीला विरोध होणे, अशा अनेक चर्चा त्यांच्याभोवती फिरत राहिल्या आहेत. हे कमी म्हणून की काय त्यात खासदर नवनीत राणा यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लागवला होता. यानंतर त्या चांगल्याच अडचणीत आल्या होत्या. भाजपच्या उमेदवार म्हणून त्या आगामी लोकसभा निवडणूक लढणार आहेत. या उमेदवारीवेळी त्यांना भाजप वरिष्ठांच्या अनेक गाठीभेटी घ्याव्या लागल्या. अखेर भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र आता नवनीत राणा यांनी थेट नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केलं आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. असं नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप देशभर मोदींच्या नावाने मतं मागत असून देशभरात मोदींची हवा असल्याचं सांगत आहे. मात्र मोदींची हवा असल्याच्या मुद्द्याला नवनीत राणा यांनी छेद दिला आहे. यामुळे येणाऱ्या काळात नवनीत राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

मतदारांना केलं आवाहन

भाजपच्या उमेदवार नवनीत राणांच्या या विधानामुळे देशात मोदींची हवा आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही निवडणूक आपल्याला ग्रामपंचायत सारखी लढायची आहे 12 वाजेपर्यंत सर्व मतदान आपल्याला बूथ वर न्यायचं आणि सर्वांनी मतदान केलं पाहिजे असं आवाहन नवनीत राणांनी मतदारांना केलं. इथपर्यंत सर्वकाही ठीक होतं. पण यानंतर त्यांनी आपल्या भाषणात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख केला. यामुळे भाषणात ट्विस्ट आला. 

काय म्हणाल्या नवनीत राणा?

मोदींची हवा आहे या फुग्यात कोणी राहू नये. एवढी मोठी यंत्रणा असून 2019 मध्ये एक अपक्ष निवडून आली होती आणि आपला झेंडा गाडून गेली होती, असे खळबळजनक वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं आहे. त्यामुळे नवनीत राणा पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

आता नवनीत राणा आपल्या विधानावरुन मागे हटतात का की सारवासारव करतील? भाजपकडून त्यांना प्रत्युत्तर दिले जाईल का? विरोधक या संधीचा फायदा कशाप्रकारे घेतील? हे सर्व येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.