Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing: लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपाचा मुद्दा थेट दिल्लीत पोहचला आहे. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. राज्यातील या तिन्ही प्रमुख नेत्यांनी शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर चर्चा झाली. या चर्चेमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटाबरोबर समाधानकारक तडजोड झाल्यास भाजपाच्या दुसऱ्या यादीत राज्यातील काही मतदारसंघांमधील उमेदवारांची घोषणा केली जाऊ शकते. मात्र या तिन्ही पक्षांना वेगळीच भीती असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेलेल्या अमित शाहांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबरोबर संयुक्तपणे चर्चा केली होती. मात्र यावेळी देण्यात आलेला जागावाटपाच्या प्रस्तावामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटात नाराजी असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळेच यावर तोडगा काढण्यासाठी राज्यातील तिन्ही प्रमुख नेत्यांनी शुक्रवारी रात्री थेट दिल्ली गाठली. अजित पवारांबरोबर त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेलही सायंकाळी सातच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. शिंदे आणि फडणवीसही रात्री आठनंतर दिल्लीत दाखल झाले. मात्र शाह यांच्याबरोबरची बैठक रात्री साडेदहानंतर सुरु झाली. बैठकीमध्ये अमित शाहांबरोबर फडणवीस, शिंदे, अजित पवारांशिवाय भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनील तटकरे उपस्थित होते. भाजपाला दुसरी यादी जाहीर करताना महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यातील उमेदवार जाहीर करायचे असल्याने केंद्रीय नेतृत्व जागावाटपासंदर्भात लवकरात लवकर एकमत व्हावं यासाठी प्रयत्न करत आहे. शुक्रवारी रात्री सुरु झालेली बैठक अगदी मध्यरात्रीनंतरही सुरु होती. अडीच तास या नेत्यांमध्ये बैठक सुरु होती.
दरम्यान, एकनाथ शिंदे गटातील विद्यमान खासदार आणि इच्छूक नेत्यांना उमेदवारी नाकारली तर ते पुन्हा उद्धव ठाकरे गटात जातील अशी भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे अजित पवार गटातही अशीच स्थिती आहे. तिकीट नाकारल्यास इच्छूक आणि विद्यमान खासदार पुन्हा शरद पवार गटाकडे जाऊ शकतात अशी शक्यता आहे. याच गोष्टीची भीती दोन्ही गटांना आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने शिंदेंना गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं लढवलेल्या जागाही नाकारल्या आणि ते शिंदेंनी मान्य केल्यास पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या सर्व बाजूंचा विचार करुन उमेदवार आणि मतदारसंघ निवडण्याचा तिन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. आज म्हणजेच 9 मार्च रोजीही राज्यातील प्रमुख नेत्यांची जागावाटपासंदर्भातील चर्चेसाठी बैठक होईल असं सांगितलं जात आहे.