Weather Update: राज्यात पुढील 3-4 दिवसांत तापमानात होणार वाढ; हवामान विभागाचा इशारा

Weather Update : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. यामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. 

सुरभि जगदीश | Updated: Mar 9, 2024, 06:40 AM IST
Weather Update: राज्यात पुढील 3-4 दिवसांत तापमानात होणार वाढ; हवामान विभागाचा इशारा title=

Weather Update : मार्च महिना सुरू झाला असून, थंडी कमी होऊन उकाडा जाणवू लागलाय. अशा स्थितीत अपेक्षेच्या विरुद्ध मुंबईच्या किमान तापमानात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. आता थंडी हळूहळू गायब होताना दिसत असून राज्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यातील तापमानात वाढ होताना दिसणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील 3-4 दिवसांत महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. यामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यावेळी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या पावसामुळे सर्वात जास्त नुकसान झाल्याचं दिसून आलं. वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे देशासह राज्याच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. याचा परिणाम राज्यातील हवामानात बदल होत असून आता रात्री थंडी, दिवसा उन्हाचा उकाडा जाणवण्यास सुरूवात झालीये. 

पुणे हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 3-4 दिवसांत महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तवण्यात आलाय. यावेळी शहर आणि उपनगरात प्रामुख्याने आकाश निरभ्र राहणार आहे. 

सध्या मुंबईसह कोकण किनारपट्टी, ठाणे, पालघर या भागांमध्ये उन्हाळा जास्त तीव्र होताना दिसतोय. उन्हाच्या चटक्यामुळे दुपारच्या वेळी काम नसल्यास घराबाहेर न पडण्याचा इशारा नागरिकांना देण्यात येतोय. 

देशात कसं असणार आहे हवामान?

स्कायमेट हवामान अहवालानुसार, शनिवारी गंगेच्या पश्चिम बंगाल आणि दक्षिण केरळमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 10 मार्चपासून पश्चिम हिमालयीन भागात पाऊस आणि बर्फवृष्टी पुन्हा एकदा वाढू शकते. याशिवाय रविवारी संध्याकाळपासून उत्तराखंडमध्ये नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होऊ शकते. त्यामुळे उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, पिथौरागढ आणि बागेश्वरमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.