प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार सुरुवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दुसरीकडे आता उमेदवार जाहीर झाला नसला तर महायुतीने रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपने कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला सुरुवात केली आहे. अशातच भाजपच्या एका जेष्ठ नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जातोय असे धक्कादायक विधान केलं आहे. भाजपच्या जेष्ठ नेत्याने केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सतेत्त आल्यास भारत जगात शक्तिशाली बनेल या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जातोय, असे खळबळजनक विधान भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. गुहागरमध्ये महायुतीची सभा पार पडली त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. यावेळी मधुकर चव्हाण यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
"सावध व्हा, घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत जगात शक्तिशाली होईल या भीतीने पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचला जातोय. कमळ हा आपला प्राण तर घड्याळ हा आपला श्वास आहे. पुढील महिनाभर घड्याळ नजरेसमोर ठेऊन कामाला लागा. आपल्याला मोदींसाठी हात वर करणारा खासदार हवाय," असं मधुकर चव्हाण म्हणाले.
उद्धव ठाकरे सोनिया गांधींसमोर झुकले
"अनंत गीते तुम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली काम करताय? तुमचे नेतृत्व उध्दव ठाकरे हे लाचार आहेत. बाळासाहेब ठाकरे हे आयुष्यात कोणासमोर झुकले नाहीत. पण उद्धव ठाकरे तुम्ही औरंगजेबासमोर झुकलात. सोनिया गांधी आणि शरद पवारांसमोर झुकलात," अशा शब्दात चव्हाणांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
मनोज जरांगेंच्या मागे शरद पवारच
"शरद पवार यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवारच आहेत. स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्या शरद पवार यांना राजा कसा असतो हे माहिती आहे का?" असा सवालही मधुकर चव्हाण यांनी केला.
प्रकाश आंबेडकरांवरही टीका
"शरद पवारांसोबत मधुकर चव्हाणांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली. देशाचे संविधान लीहणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरात प्रकाश आंबेडकर यांच्या रूपात काजवा जन्माला आला," अशा शब्दात मधुकर चव्हाणांनी प्रकाश आंबेडकरांवर घणाघात केला.