'निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते कपडे फाडणार'; मत वाया घालवू नका म्हणत मोदींची विरोधकांवर टीका

Loksabha Election : नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पाडली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

आकाश नेटके | Updated: Apr 20, 2024, 12:13 PM IST
'निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते कपडे फाडणार'; मत वाया घालवू नका म्हणत मोदींची विरोधकांवर टीका title=

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठवाड्यात आज दोन सभा होणार आहेत. नांदेड आणि परभणी येथे सभा होणार आहेत. नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आणि हिंगोलीचे शिंदे गटाचे उमेदवारी बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला. यासोबत पहिल्या टप्प्यात एनडीएला एकातर्फी मतदान झाल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.

"देशात पहिल्या टप्याचे मतदान झाले आहे. त्यामुळे मतदान करणाऱ्या आणि पहिल्या वेळी मतदान करणाऱ्यांचे  आभार मानतो. पहिल्या टप्प्यात एनडीएला एकातर्फी मतदान झालं आहे. मात्र कोणालाही मतदान करा पण मतदान जरूर करा. सध्या उष्णता खूप आहे, लग्नसमारंभ आहेत, शेतकऱ्यांचे काम सुरू आहे. पण देशाच्या सीमेवर कोणत्याही परिस्थितीत जवान उभा असतो. मतदारांमध्येही ही जागृती असली पाहिजे. आपल्या देशाचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी मतदान करा. लोकतंत्रासाठी पुन्हा आग्रह करतो मोठ्या प्रमाणात मतदान करा," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

"ज्यांचा पराभव पक्का आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सांगतो मतदान करण्यासाठी सर्वांना प्रेरित करा. जगात सर्वाधिक मतदान भारतात होतं. तसेच अधिक मतदान लोकशाहीचा परिचय देते. पहिल्या टप्प्यात मतदारांनी इंडिया आघाडाली नाकारले आहे. तुमच्याकडे कोणाचा चेहरा आहे. देश कोणाला सोपवायचा आहे हे तर सांगा," असा सवालही पंतप्रधानांनी इंडिया आघाडीला केला. यासोबत 'काँग्रेसचे नेता आपला पराभव मान्य केलाय. त्यांच्यात निवडणूक लढण्याची हिम्मत नाही. त्यांना उमेदवार मिळणे कठीण झाले आहे. यांचे नेते प्रचार करण्यासाठी जात नाहीत. 25 टक्के जागा अश्या आहेत इंडी आघाडीचे लोक एकमेकांविरोधात लढत आहेत. जे आघाडीवर विश्वास ठेवू शकत नाहीत त्यावर तुम्ही विश्वास ठेवणार का? या निवडणुकीत यांना धडा शिकवणे गरजेचे आहे,' असेही पंतप्रधान म्हणाले.

"काँग्रेसच्या शहजाद्याला वायनाडमध्ये पराभव दिसतो आहे. शहजाद्याला पुन्हा दुसऱ्या ठिकाणी निवडणूक लढावी लागणार आहे. आधी अमेठी वरून पळावे लागले आणि आता वायनाड पण सोडावं लागणार. काँग्रेसचा परिवार स्वतः काँग्रेसला मतदान करणार नाही. 4 जूनच्या नंतर एक दुसऱ्यांचे कपडे फाडणार आहेत. इंडिया आघाडीला कोणताही समजूतदार नागरिक मतदान करुन मत वाया घालवणार का?" त्यामुळे विकसित भारतासाठी मतदान करा, असेही आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.

"काँग्रेसने दिलेल्या प्रत्येक जखमेचा इलाज करणे ही मोदींची गॅरंटी आहे. आमचा खूप वेळ काँग्रेसने केलेले खड्डे भरण्यात गेलाय. येणाऱ्या पाच वर्षात मराठवाडा आणि महाराष्ट्राला समोर न्यायचे आहे. त्यामुळे नांदेड लोकसभेतील प्रताप पाटील आणि हिंगोलीत बाबुराव कोहळीकर यांना रेकॉर्ड मतांनी विजयी करा. मतदांचे संपूर्ण रेकॉर्ड तुटले पाहिजे. प्रत्येक घरात जाऊन मोदींचा प्रणाम पोहोचवा," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.