कैलास पुरी, पिंपरी चिंचवड : या लग्नाची गोष्ट एकदम हटके आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. मात्र, ही लगीन गाठ एका प्रश्नाने बांधली गेली. त्याने तिला एवढंच म्हटलं, तू इतके दिवस होतीस कोठे? आणि तिच्या मनाची घालमेल झाली. पुढे जे काही झाले ते एकदम अभिमानास्पद. आज त्यांचा संसार सुखात सुरु असून या संसारात एक गोंडस मुलीच्या रुपाने परी आहे.
ती सौंदर्याचं मूर्तीमंत प्रतिक. तो ही दिसायला बरा. पण गतिमंद....! तो गतिमंद असून ही तिने त्याच्याशी लग्नगाठ बांधली. फक्त लग्नगाठ बांधली असं नाही तर ती त्याची सर्वस्व बनली. एका कुटुंबाचा ती आधार बनली.
जिथं बहुतांश मुली घोड्यावरून येणाऱ्या राजकुमाराची वाट बघतात तिथं तिने धीरोदत्तपणे त्याच्याशी संसार थाटला. कोण आहे ती. हळवी पण प्रेरणादायी प्रेमकहाणी...!
बोलके डोळे आणि निखळ सौंदर्याचं वरदान मिळालेली ती आहे सुरुची त्रिवेदी. मूळची उत्तर प्रदेशातल्या आल्हाबादची. इतर मुलींप्रमाणेच तिनेही लग्नाविषयी अनेक कल्पना रंगवल्या होत्या! पण नियतीनं तिच्यासाठी काही वेगळंच लिहलं होतं...!
सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे तिला लग्नाचा प्रस्ताव गेला...! तो प्रस्ताव होता प्रकाशचंद जयश्री त्रिवेदी यांचा मुलगा यश तर्था टोनी याचा...! प्रस्ताव गेला तेव्हाच तिला टोनी गतिमंद असल्याचं माहीत होते...! पण टोनीचा फोटो तिने पाहिला आणि तिने टोनीची भेट घ्यायचा निर्णय घेतला...! ती टोनीला पाहायला गेली. तिला पाहताच टोनी तिला म्हणाला इतक्या दिवस का भेटली नाहीस. टोनीचा हा प्रश्न ऐकून ती थक्कच झाली.
तो आपलीच वाट पाहतोय असा विचार तिने केला. स्वतःसाठी सगळेच जगतात. दुसऱ्यासाठी जगू ही भावना तिच्या मनात आली आणि सुरुचीने टोनीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला...! आणि धुमधडाक्यात त्यांचा विवाह पार पडला..!
अर्थात सुरुचीसाठी हे म्हणावे तेवढे सोपे नव्हते...! सुरुवातीला निर्णय चुकला की काय अशी भावनाही तिच्या मनात आली. पण प्रेमाच्या ताकतीवर आणि कुटुंबीयांच्या मदतीने तिने टोनीला तर संभाळलचं पण त्याच्या कुटुंबियाची ती भक्कम आधार बनलीय...!
जिथं मुलाचं लग्न तर सोडाच पण आपल्या पश्च्यात त्याचे काय होणार या विचाराने चिंताग्रस्त झालेल्या त्रिवेदी कुटुंबाला सुरुचीच्या रूपाने टोनीची जीवनसाथी तर भेटलीच. पण एक मुलगी मिळाल्याचा आनंद त्यांना होतोय. टोनी सुरुचीची गोंडस मुलगी पियुशा त्यांच्या सुखी संसाराची साथ देतेय. टोनीच्या आईचा तर बोलताना गळा दाटून येतोय...!
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हंटल जातं. पण बऱ्याचदा या गाठी बांधायच्या नाही हे आपल्या ही हातात असतं...! सुरुचीने टोनी बरोबर ही लग्न गाठ तर बांधलीच पण गेल्या ७ वर्षात निस्वार्थ प्रेमाणे तीने त्रिवेदी कुटुंबात आनंद भरलाय. जिथे छोट्या मोठ्या गोष्टीने विवाह तुटतात तिथं एक धाडसी निर्णय घेत केवळ प्रेमाच्या जीवावर संसाराचं रोपटे फुलवणाऱ्या सुरुचीचे कौतुक करावे तेवढे थोडे!