श्रीकांत राऊत, झी २४ तास, यवतमाळ: नांदेड व यवतमाळच्या नदीतीरावरील गावांमध्ये शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास तीन ते पाच सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. सौम्य स्वरूपाचे हे धक्के असले तरी ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.
विदर्भ मराठवाडा सीमेवरून पैनगंगा नदी वाहते, पैनगंगा तीरावरील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, महागाव, उमरखेड, दिग्रस, दारव्हा व घाटंजी या सहा तालुक्यांमधील २४ गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. ३.१ रिक्टर स्केल चे हे धक्के होते, अमरावतीच्या मोर्शी केंद्रावरून १६६ किमी अंतरात हे धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेली असली तरी अनेक गावांमध्ये सौम्य स्वरूपाचे धक्क्याने घरातील भांडी पडणे, घरावरील टिनाचे छप्पर पडणे व घरांना तडे जाणे अशा घटना घडल्याचे सांगितल्या जात आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्याने व वेगवेगळ्या अफवा पसरविल्या गेल्याने गावातील नागरिकांनी भीतीने रस्त्यावर धाव घेतली.
उमरखेड तालुक्यातील कुरुळी, बोरगाव, साखरा, निंगणुर, नारळी, अकाली, मल्याळी, ढाणकी, बिटरगाव, खरुस, चातारी, एकांबा, टेम्भुरदरा तर महागाव तालुक्यातील हिवरा संगम, ईजनी दिग्रस तालुक्यातील सिंगद, दारव्हा तालुक्यातील खोपडी, आर्णी तालुक्यातील राणी धानोरा, अंजनखेड, साकुर, मुकिंदपुर घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा, कुर्ली या गावांना भूकंपाचे धक्के जाणवल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. जिल्ह्याच्या मराठवाडा सीमेवरील बहुतांश तालुक्यातील गावांमध्ये हे धक्के जाणवले आहे. महागाव तालुक्यातील करंजखेड, कासारबेहळसह सहा गावांमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान जिल्हा प्रशासनाने यंत्रणेला सतर्क केले आहे.