नगरसेवकेच्या पतीचा हट्ट, पुणेकरांना मनस्ताप

या झोपडपट्टीधारकांना औंधमध्ये सदनिका मिळू नये, अशी याचिकाही मुसळेंच्या मेव्हण्याने केली आहे

Updated: May 8, 2018, 10:55 PM IST

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुण्यात नगरसेविकेच्या पतीच्या हट्टामुळे अडीचशे झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन रखडलंय. पुनर्वसन रखडल्याने दीड महिन्यापासून पुणे आणि पिंपरी  - चिंचवडला जोडणाऱ्या हॅरीस ब्रीजचं काम ही थांबलंय. याबरोबरच पुनर्वसनाच्या विषयाला धार्मिक रंग देण्याचा आरोपही नगरसेविकेच्या पतीवर आहे. पुण्यातल्या हॅरीस ब्रीजच्या विस्तारीकरणाचं काम दीड महिन्यांपासून थांबलंय. पुणे आणि पिंपरी  - चिंचवडला जोडणारा आणि त्यामुळं प्रचंड रहदारीचा पूल... पूलाचं काम थांबलंय त्याला कारण म्हणजे ही समोरची झोपडपट्टी... या गांधीनगर झोपडपट्टीचं पुनर्वसन रखडलंय. त्याचं कारण नगरसेविका अर्चना मुसळे आणि त्यांचे पती मधुकर मुसळे... अडीचशे झोपडपट्टीधारकांना महापालिकेनं सदनिका दिल्या आहेत. त्याचा ड्रॉ काढण्यात आला, भाडं आणि डिपॉझीट घेण्यात आलं... किल्ल्या आणि ताबापत्र देण्यात आली... अनेकांनी सामान शिफ्ट केलंय तर अनेकांनी फर्निचर केलंय. एवढं सगळं झाल्यावर ही त्यांना नवीन सदनिकेत जाता येत नाही... या सर्वांचा आक्षेप मुसळेंवर आहे.

या झोपडपट्टीधारकांना औंधमध्ये सदनिका मिळू नये, अशी याचिकाही मुसळेंच्या मेव्हण्याने केली आहे. त्यामुळं या आरोपांना पुष्टीच मिळते. ज्या ठिकाणी सदनिका देण्यात आल्या त्या ठिकाणची परीस्थिती हेच सांगतेय. महापालिकेच्या मालकीच्या रसत्यावरील गेटला खाजगी कुलूप लावण्यात आलं आहे. कोर्टाचा आदेश आणा आणि आत या असा आदेशच आतल्या सोसायटीतील लोक देतात.     

विशेष म्हणजे सदनिका वाटपाच्या कार्यक्रमाला मुसळे पती पत्नी स्वतः उपस्थित होते. तसेच, त्यांच्या हस्ते सदनिका वाटपही करण्यात आलं. तरीही मुसळेंचा विरोध का हा प्रश्न आहेच.  धार्मिक द्वेषातून मुसळेंच्या मेव्हण्याचा विरोध असल्याचा आरोप करण्यात येतोय. मात्र मुसळेंनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.  

हा प्रश्न फक्त पुनर्वसनापुरता मर्यादित नाही तर त्याहून गंभीर  प्रश्न हॅरीस ब्रीजच्या कामाचा आहे. झोपडपट्टीधारकाचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत ब्रीजचं काम पुढं सरकणार नाही. दीड महीन्यापासून हे काम बंद आहे. बरं, या प्रभागातील भाजपचे इतर तीन नगरसेवक मुसळेंसोबत नाहीत. मुसळेंच्या भूमिकेवर त्यांच्याच पक्षातील आणि त्यांच्याच प्रभागातील नगरसेवक टीका करत आहेत.  

एका नगरसेविकेच्या पतीची आडमुठी भूमिका विकास कामात कशी खीळ घालू शकते याचं हे उदाहरण. याआधीही महापालिका कर्मचाऱ्यांना दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा मुसळेंवर दाखल आहे. शिस्तीचा पक्ष अशी ओळख असलेला भाजप मुसळेंच्या या बेशीस्तीची कशी दखल घेणार हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.