Uddhav Thackeray Rally : जळगावात आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तोफ धडाडणार असून मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) व आमदार किशोर पाटलांसह जिल्ह्यातील शिंदे गटाच्या (Shinde Group) पाच आमदारांच्या मतदार संघात उद्धव ठाकरेंची आज भव्य जाहीर सभा होणार आहे. पाचोरा (Pachora) येथील सावा मैदानात संध्याकाळी 6 वाजता सभेला सुरुवात होणार आहे. या सभेत खासदार संजय राऊत (Sanjay Raut), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुषमा अंधारे, चंद्रकांत खैरे, शुभांगी पाटील, माजी आमदार स्वर्गीय आर ओ तात्या पाटील यांच्या कन्या वैशाली पाटील यांच्यासह ठाकरे गटाचे सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
रविवारी दुपारी उद्धव ठाकरे यांचे जळगाव विमानतळावर आगमन होणार असून जळगावमधील काही कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पाचोरा येथे माजी आमदार स्वर्गीय आर ओ तात्या पाटील यांच्या पुतळ्याचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. तर सायंकाळी सहा वाजता उद्धव ठाकरे हे सावा मैदानात होणाऱ्या सभेसाठी पोहोचणार आहेत.
दुसरीकडे, जळगावात होणाऱ्या या सभेसाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे शनिवारीच जळगावात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी सभास्थळी जाऊन तयारीचा आढावा घेतला. रविवारी ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांनीही सभास्थळाची पाहणी केली. तसेच या सभेमुळे जळगावातील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे सभेच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त जळगावात ठेवण्यात आला आहे. सभेच्या ठिकाणी आणि उद्धव ठाकरे यांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर देखील तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
सभेआधीच उद्धव ठाकरे यांचे बॅनर्स हटवले
जळगावच्या पाचोरामध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आहे. मात्र त्याआधीच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी लावलेले बॅनर्स पोलिसांनी हटवले आहेत. ठाकरे गटाकडून जळगावमध्ये सभेआधी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते. मात्र या बॅनरबाजीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याआधीच पोलिसांनी कारवाई करत हे बॅनर्स हटवले आहेत.
गुलाबराव पाटलांकडून 400 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार
पाचोऱ्यात होणाऱ्या सभेपूर्वी खासदार संजय राऊत यांनी जळगावचे पालकमंत्री तथा शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. गुलाबराव पाटील यांनी करोना काळात 400 कोटी रुपायांचा भ्रष्टाचार केल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. करोना काळात पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चढ्या भावात वस्तूंची खरेदी केली होती. यामध्ये ऑक्सिजन व्हेंटीलेटर्सचाही समावेश होता. त्यावेळी दोन लाखांचं व्हेंटीलेटर 15 लाखांना खरेदी केले गेले, असे संजय राऊत म्हणाले.