राज्यपालांनी कॉंग्रेस-एनसीपीला सत्तास्थापनेचे निमंत्रण द्यावे- देवरा

'राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे अशी इच्छा'

Updated: Nov 10, 2019, 01:10 PM IST
राज्यपालांनी कॉंग्रेस-एनसीपीला सत्तास्थापनेचे निमंत्रण द्यावे- देवरा  title=

मुंबई : महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या भाजपाला राज्यपालांनी सरकार बनविण्याचे आमंत्रण दिले. शिवसेनाशिवाय १०५ आमदारांसोबत असलेल्या भाजपाला बहुमत मिळवण्यासाठी करण्यासाठी १४५ चा आकडा पार करावा लागणार आहे. अशावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येऊन सत्ता स्थापन करु शकते आणि काँग्रेस त्यांना बाहेरुन पाठींबा देईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी देखील महत्त्वाचे विधान केले आहे. 

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. दोन्ही पक्षांचे आमदार मिळून बहुमत मिळणार नाही, यावर देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे निमंत्रण द्यायला हवे. कारण भाजपा-शिवसेनेने एकत्र सत्ता स्थापन करण्याचे नाकारले आहे. अशावेळी एनसीपी आणि काँग्रेस राज्यात दुसरी मोठी आघाडी असल्याचे ते म्हणाले.

'भाजपा सत्तेपासून दूर'

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापनेचा दावा करेल. यानंतर भाजप सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागेल. दरम्यान भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांबरोबरच केंद्र पातळीवरील नेतेही आग्रही आहेत. यासाठी समोर येणारा दुसरा पर्याय स्वीकारण्यास हे नेते सकारात्मक आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी जवळीक असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.