जळगावात पोलिसांची दारु पार्टी, गणवेशातच बारमध्ये दारू पिऊन धिंगाणा.. आपापसातच भिडले

Jalgaon : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर जळगावमध्ये पोलिसांनी चक्क दारु पार्टी केल्याचं समोर आलं आहे. बंदोबस्त सोडून काही पोलीस बारमध्ये गेले आणि गणवेशातच बारमध्ये दारू पिऊन धिंगाणा घातला. त्यानंतर  मद्यधुंद अवस्थेत कारने दोन दुचाकी आणि एका सायकलस्वारालाही धडक दिली.

राजीव कासले | Updated: Aug 26, 2024, 10:33 PM IST
जळगावात पोलिसांची दारु पार्टी, गणवेशातच बारमध्ये दारू पिऊन धिंगाणा.. आपापसातच भिडले title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया जळगाव : 'लखपती दीदी' मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) रविवारी जळगाव दौऱ्यावर आले होते. यासाठी जळगावमध्ये  कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण पीए मोदी यांचा कार्यक्रम संपल्यानंतर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी चक्क दारु पिऊन धिंगाणा घातल्याचं समोर आलं आहे.  बंदोबस्त सोडून काही पोलीस बारमध्ये गेले आणि गणवेशातच बारमध्ये दारू पिऊन धिंगाणा घातला. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत कारने दोन दुचाकी आणि एका सायकलस्वारालाही धडक दिली.

हे पोलीस जळगावात (Jalgaon) बंदोबस्तासाठी आल्याचं आणि जिल्ह्यातील असल्याची माहिती देखील समोर आली आहे. जळगाव शहरातील भास्कर मार्केट परिसरातील एका बारमध्ये चार ते पाच पोलीस कर्मचारी आले ते गणवेशातच होते. भरपूर मद्यपान केल्यानंतर त्यांनी बारमध्ये धिंगाणा घातला. त्यानंतर बील देण्याच्या वादातून त्यांच्यात आपापसात भिडले. त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हे पोलीस इतके मद्यधुंद झाले होते की, त्यांना कार चालवणं देखील शक्य होत नव्हतं. यानंतरही त्यांनी कार चालवत दोन दुचाकी आणि एका सायकल स्वाराला धडक दिली.

धिंगाणा घालणाऱ्या पोलिसावर कारवाई
दारुच्या नशेत  धिंगाणा घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तडकाफडकी निलंबित केलं आहे. रविवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर पोलीस स्थानकात नियुक्त संदीप धनगर या पोलीस कर्मचाऱ्यने जळगाव शहरातील शालिमार हॉटेलमध्ये दारु पिऊन धिंगाणा घातला.  संदीप धनगर कर्तव्यावर नसताना देखील त्याने पोलीस गणवेश धारण केलेला होता. त्यामुळे त्याच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत अद्याप कुणीही फिर्याद न दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.