मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा घुमजाव? पदावरुन महायुतीत सुप्त संघर्ष?

Amit Shah on Maharashtra CM Post: महाराष्ट्रात विधानसभा निवडुकीच महासंग्राम शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याबाब उत्सुकता आहे. 

प्रविण दाभोळकर | Updated: Nov 10, 2024, 09:34 PM IST
मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा घुमजाव? पदावरुन महायुतीत सुप्त संघर्ष?
अमित शाह

Amit Shah on Maharashtra CM Post: विधानसभा निवडणूक आल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर भावी मुख्यमंत्री कोण असणार याबद्दल दोन्ही बाजुला घमासान पाहायला मिळाले. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे असतील असे विधान ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आले. पण याला शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून विरोध झाला. यानंतर मविआतील मुख्यमंत्री पदाची चर्चा थांबली. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे समीकरण ठरले. दुसरीकडे महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? याबद्दलही तर्क वितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात असल्याचे महायुतीचे नेते सांगत आहेत. असे असले तरी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकतात, असा सूरही कानी पडत आहे. यासंदर्भात बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्रिपदावरून एक मोठं वक्तव्य केलंय. यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलंय.

Add Zee News as a Preferred Source

काय म्हणाले अमित शाह?

मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या उपस्थितीत भाजपनं संकल्प पत्र म्हणजेच जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्यात. मात्र महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नावर बोलताना अमित शाह यांनी घुमजाव केलं."तुम्ही जो मुख्यमंत्रिपदासंदर्भात जो प्रश्न विचारला त्याचं मी आधी उत्तर देतो. कारण त्या उत्तरानंतर आता प्रश्न विचारायला ज्यांनी हात वर केले आहेत जे पुन्हा हात वर करणार नाही," असं अमित शाह यांनी म्हणताच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हसू लागले. स्वत: अमित शाहही यावर हसले. त्यानंतर पुढे बोलताना शाह यांनी, "सध्या महाराष्ट्रात युती सरकारचं नेतृत्व एकनाथ शिंदेंजी करत आहेत. एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री आहेत. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हे तिन्ही पक्ष एकत्र बसून हे ठरवतील. आम्ही शरद पवारांना कोणतीही संधी देणार नाही," असं उत्तर दिलं. 

मुख्यमंत्री पदाबात सूचक विधान

विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी अमित शाह यांनी सांगलीतल्या शिराळ्यात सभेत फडणवीस यांचं नाव घेत तेच महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री असतील असं सूचक विधान केलं होतं. आधी फडणवीस मुख्यमंत्री होतील असं अमित शाह म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, असं शाह म्हणाले. मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असं भाकित 'झी 24 तास'च्या 'टू द पॉईंट' या कार्यक्रमात वर्तवलंय. तसंच राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असून, मनसे किंगमेकर राहणार असल्याचंही राज ठाकरे म्हणालेत.

 महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून सुप्त संघर्ष?

यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होतेय. महायुतीचे सर्वच नेते सत्तेत येण्याचा दावा करत आहेत. मात्र महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून सुप्त संघर्ष सुरू आहे. तो ऐन निवडणुकीच्या तोंडावर उघड होऊ नये यासाठी मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावरून शाह यांनी घुमजाव केलंय का अशी चर्चा सुरू आहे.

...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटले असते का?

अमित शहा यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीसंदर्भात विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अमित शाहांनी, "शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंऐवजी अजित पवारांची नेता म्हणून निवड केली असती तर पक्ष तुटला असता का? उद्धव ठाकरेंनीही आपल्या मुलाऐवजी एकनाथ शिंदेंना प्राधान्य दिलं असतं तर पक्ष तुटला असता का? आपल्या कुटुंबाला प्राधान्य देण्याच्या नादात या लोकांनी स्वत: आपले पक्ष फोडले आहेत आणि आता आम्हाला दोष देत आहेत," असं म्हटलं. 

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More