'मुख्यमंत्री म्हणून जरांगेंनी माझी पण काय काढायची ती काढली, असं कधी...'; शिंदेनी सुनावलं

CM Eknath Shinde Comment On Manjor Jarange Stand: रात्री (भेटीसाठी) कोण गेलं, सकाळी कोण गेलं? दगड कोणी गोळा केले? कोणी मारले? याचा अहवाल पोलिसांकडे आहे. हे लपतं का?" असा सवाल शिंदेंनी सभागृहात उपस्थित केला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 27, 2024, 02:48 PM IST
'मुख्यमंत्री म्हणून जरांगेंनी माझी पण काय काढायची ती काढली, असं कधी...'; शिंदेनी सुनावलं title=
मुख्यमंत्र्यांनी थेट जरांगे-पाटलांची उल्लेख करत केलं विधान

CM Eknath Shinde Comment On Manjor Jarange Stand: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज विधानपरिषदेमध्ये मनोज जरांगे-पाटलांच्या वक्तव्यांमध्ये राजकीय वास येऊ लागल्याचं म्हटलं आहे. शिंदेंनी मनोज जरांगेंचं आंदोलन प्रमाणिकपणे सुरु होतं तेव्हा अगदी आपण स्वत: त्यांना प्रोटोकॉल बाजूला ठेऊन गेलो होतो असं आवर्जून सांगितलं. मात्र मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत कहरच केला. हे असं कुठे असतं का? असा सवाल विचारत जरांगेच्या विधानांवर नाराजी व्यक्त केली.

या मागे कोण आहे?

"(जरांगेंचं) एकेरी पद्धतीने बोलणं (होतं). या सगळ्या गोष्टीचा कहर केला की देवेंद्रजींवर अगदी खालच्या पातळीवर आरोप केला. त्यांना विष देऊन मारणार आहेत. हे अशाप्रकारचं वक्तव्य होऊ लागलं. तेव्हा मी पत्रकार परिषदेतही बोललो की ही भाषा कार्यकर्त्याची नाही. ही भाषा राजकीय भाषा आहे. या मागे कोण आहे?" असा सवाल मुख्यमंत्री शिंदेंनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदे खोटं बोलून कोणालाही फसवणार नाही

"आज आपला  महाराष्ट्र पुरोगामी आहे. सगळ्या जाती, समाज इथे एकत्र राहतात, एकत्र काम करतात. जातीजातीमध्ये भांडणं लावण्याचं काम कुणालाही करता येणार नाही. आम्हाला कळलं ते म्हणून ओबीसी बांधवांना सांगितलं की सरकारवर विश्वास ठेवा, तुमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. एकनाथ शिंदे खोटं बोलून कोणालाही फसवणार नाही. काम टाळण्यापुरतं कुठलंही काम सरकार करणार नाही," असा शब्द मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं. "कुठल्याही कायद्याच्या बाहेर जाऊन सरकार कोणतंही खोटं आश्वासन देणार नाही हे मी अनेकदा सांगितलं आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. याचा लाभ मराठा समाजाला होणार आहे," असंही शिंदेंनी सांगितलं.

नक्की वाचा >> मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 'त्या' वक्तव्यांप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिले SIT चौकशीचे आदेश

दगड कोणी गोळा केले? कोणी मारले?

"मनोज जरांगे पाटलांबरोबर काम करणाऱ्या काही लोकांनी सोशल मीडियावर चर्चा केली. त्यामुळे चर्चा झाली. रात्री (भेटीसाठी) कोण गेलं, सकाळी कोण गेलं? कोण कधी जातो कुठल्याही गोष्टी लपत नाही. दगडफेक झाली त्याचा अहवालही पोलिसांकडे आहे. दगड कोणी गोळा केले? कोणी मारले? याचा अहवाल पोलिसांकडे आहे. हे लपतं का?" असा सवाल शिंदेंनी सभागृहात उपस्थित केला.

कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या मागण्या

"प्रामाणिक आंदोलन होतं तेव्हा मंत्री गेले, मुख्यमंत्री गेले, सगळे अधिकारी गेले. आम्ही सगळे अधिकारी पाठवले. कुठेतरी माणासाने कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या मागण्या करणं योग्य आहे का?" असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

नक्की वाचा >> 'फडणवीस मराठा समाजाविरोधात नाहीत!' CM शिंदे जरांगेंचा उल्लेख करत म्हणाले, 'कोणीही...'

मुख्यमंत्री म्हणून माझी पण काढली

"मनोज जरांगे पाटील प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी आंदोलन करत होता. मी स्वत: गेलो त्या ठिकाणी. एकदा नाही दोनदा गेलो. कुठला मुख्यमंत्री जातो? मी सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवला. एवढ्या मोठ्या गर्दीत गेलो मी स्वत:! शशिकांत शिंदे तिथे होते. एवढी गर्दी असतानाही मी तिकडे गेलो. हे सगळं केल्यानंतरही टीका झाली. मनोज जरांगे पाटील यांच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. मात्र ज्या पद्धतीने सरकारने मराठा समाजासाठी काम केलं ते स्वीकारण्याऐवजी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री म्हणून माझी पण काय काढायची ती काढली. उपमुख्यमंत्र्यांबरोबरच इतर मंत्र्यांनाही बोलले. असं कधी होतं का? असं कधी चालतं का? सरकार म्हणून आम्ही निर्णय घेणारे लोक आहोत. आम्ही विरोधी पक्षाला एकत्र घेत निर्णय घेतला," असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

नक्की वाचा >> मराठ्यांना दिलेलं 10% आरक्षण टिकणारच; शिंदेंना विश्वास! म्हणाले, 'कुठल्याही कोर्टात..'

सरकारने हातावर हात बांधून बासायचं का?

"मराठा संयम ठेवत होता. आमदारांचं घर जाळायला लागले. त्याची फॅमेली घरी असता. एसट्या जाळू लागले. अशा परिस्थितीत सरकारने काय करायचं हातावर हात बांधून बासायचं. हायकोर्टानेही सांगितलं सर्व समाजाचं आणि सर्वांच्या जीविताचं संरक्षण करण्याचं काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आहे. सरकार हातावर हात बांधून बासू शकत नाही. सरकार कोणावर अन्याय करु शकत नाही," असं मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडताना म्हटलं.