'माझ्याविरुद्ध 600 उमेदवार उभे केले तरी फरक पडणार नाही, कारण...'; अमित ठाकरेंचं विधान

Maharashtra Assembly Election Amit Thackeray Mahim Rally Speech: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रविवारी सायंकाळी माहीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरेंच्या प्रचार्थ जाहीर सभा घेतली आहे. या सभेत अणित ठाकरेंनीही भाषण केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 11, 2024, 06:37 AM IST
'माझ्याविरुद्ध 600 उमेदवार उभे केले तरी फरक पडणार नाही, कारण...'; अमित ठाकरेंचं विधान title=
जाहीर सभेत केलं विधान

Maharashtra Assembly Election Amit Thackeray Mahim Rally Speech: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंना दादर-माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यापासून हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. असं असतानाच राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना भांडूपऐवजी दादर-माहीममधून लढण्याचा सल्ला दिल्याचं 'झी 24 तास'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. एकीकडे राज ठाकरे मनसेच्या उमेदवारांचा प्रचार करत असतानाच त्यांनी रविवारी पुत्र अमित ठाकरेंसाठीही जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये अमित ठाकरेंनी केलेल्या भाषणामध्ये, स्थानिकांच्या समस्या सोडवण्यास आपलं प्राधान्य राहणार असल्याचं म्हटलं. तसेच येथून अनेक उमेदवार रिंगण्यात असल्याबद्दलही त्यांनी सूचक विधान केलं.

देशाच्या आर्थिक राजधानीत असं होणं शोभत नाही

पाण्यासारखी मूलभूत सुविधाही माहिममधील लोकांना मिळत नसल्याबद्दल अमित ठाकरेंनी खेद व्यक्त केला. "माहिमकरांनी आतापर्यंत खूप सहन केलं आहे. मी प्रचारासाठी घरोघरी फिरतो आहे, माझी पत्नी, आई, सासरे आणि आत्या असे सर्वजण वेगवेगळे घरोघरी फिरत आहेत. काल जेवताना आईने सांगितलं, की ती कोळी बांधवांच्या वसाहतीत गेली असताना, एक कोळी बांधव म्हणाला की, ‘आमच्याकडे पाणीच नाही, दिवाळीच्या दिवशी अंघोळही करू शकलो नाही, तुम्ही काही करू शकाल का?’ हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. माहीमसारख्या सुसंस्कृत भागात पाण्याची समस्या असावी? देशाच्या आर्थिक राजधानीत असं होणं शोभत नाही," असं अमित ठाकरे म्हणाले 

विचार करा, आमदार झाल्यावर मी...

"पोलीस वसाहतींमधील दुरावस्था, कोळी बांधवांच्या समस्या, महिलांच्या समस्या आणि पाण्याचा प्रश्न हे गंभीर प्रश्न असले तरी सुटण्यास सोपे आहेत. एकदा संधी दिल्यास, या सर्व प्रश्नांवर मी एका महिन्यात तोडगा काढीन," असं आश्वासन अमित ठाकरेंनी माहिमकरांना दिलं. "मी नेहमी विभागात चालत फिरतो, त्यामुळे अनेक नागरिक मला थेट भेटतात आणि त्यांच्या समस्या सांगतात. आमदार नसतानाही मी अनेक प्रश्न सोडवले आहेत; विचार करा, आमदार झाल्यावर मी किती अधिक करू शकतो," असंही अणित ठाकरे म्हणाले. 

जास्त संख्येनं उणेदवार विरोधात असल्याबद्दल अमित ठाकरे काय म्हणाले?

"माझं ध्येय लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य आणि समाधान आणणं आहे. पूर्वीचा आनंद परत मिळवून देणं हीच माझी महत्वाकांक्षा आहे. माझं व्हिजन खूप मोठं आहे, त्यामुळे या समस्या तर मी सोडवणारच," असा विश्वास अमित ठाकरेंनी व्यक्त केला. तसेच याच मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबरच उद्धव ठकारेंच्या शिवसेनेनंही उणेदवार दिला आहे. यासंदर्भात बोलताना अमित ठाकरेंनी, "माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वत्र चर्चा होती की लढत त्रिकोणीय असेल. पण मी सांगू इच्छितो की, माझ्या विरोधात पाच-सहा नव्हे, तर ६०० उमेदवार असले तरी मला फरक पडणार नाही, कारण मला माहिमकरांवर पूर्ण विश्वास आहे," असं म्हटलं आहे. 

नक्की वाचा >> राज ठाकरेंना होती काँग्रेस जॉइन करण्याची ऑफर; स्वत: गौप्यस्फोट करत म्हणाले, 'मला काही...'

आदित्य ठाकरेंच्या वेळेस वरळीत माझी चाळीस हजार मतं असताना...

दरम्यान राज यांनी, "अमितचं नाव मी माहीम विधानसभेसाठी नाव जाहीर करताना, तुम्ही उमेदवार घोषित करणार नसेन तर मी अमितला करेन असं आमचं कधीच बोलणं झालं नव्हतं. जेंव्हा अमितने माझ्याकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली तेंव्हा मी त्याला म्हणलं की तू ज्या भागात लहानाचा मोठा झालास त्या भागात उभा रहा. आदित्य ठाकरेंच्या वेळेस वरळीत माझी चाळीस हजार मतं असताना मी स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला होता. अमितच्या बाबतीत पण माझं म्हणणं होतं की तुम्हाला वाटत असेल तर करा नाहीतर करू नका. मी कोणाला काही मागणारा माणूस नाही," असं 'झी 24 तास'च्या मुलाखतीत म्हटलं.