अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला! राऊत उत्तर देत म्हणाले, 'वयाने लहान...'

Amit Thackeray Slams Uddhav Thackeray Sanjay Raut Reacts: माहिममधील जाहीर सभेत अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा काका असा उल्लेख करत खोचक टीका केल्याचा संदर्भ देत राऊतांना प्रश्न विचारण्यात आला होता.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 11, 2024, 03:37 PM IST
अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला! राऊत उत्तर देत म्हणाले, 'वयाने लहान...' title=
राऊत यांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया

Amit Thackeray Slams Uddhav Thackeray Sanjay Raut Reacts: दादर-माहीम मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच महेश सावंत निवडणूक लढवत आहेत. माहीममध्ये रविवारी अमित ठाकरेंसाठी राज ठाकरेंनी जाहीर सभा घेतली. या सभेत अमित ठाकरेंनीही जाहीर भाषण केलं या भाषणामध्ये त्यांनी त्यांचे काका उद्धव ठाकरेंवर उमेदवार दिल्याच्या मुद्द्यावरुन खोचक निशाणा साधला. या टीकेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं. 

अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

अमित ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात करताना राज ठाकरेंना माझ्यासाठी सभा घ्यावी लागत असल्याने माझ्यासाठी हा अत्यंत खराब दिवस असून मनात एक प्रकारची धाकधूक आहे असं म्हटलं. "22 ऑक्टोबरला पहिली यादी जाहीर झाली. त्यात मी अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झालो. त्यानंतर जे सुरु आहे ते ऑटो पायलेटवरच सुरु आहे. मी एवढ्या मुलाखती आणि भाषणं मी आयुष्यात कधी दिल्या नाहीत. यादी जाहीर झाल्यानंतर तीन तासामध्ये पहिल्या शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला. त्याच्यानंतर माझ्या काकांना वाईट वाटलं की मी कसा मागे पडलो? एखादं दोन दिवसात त्यांचा पण उमेदवार जाहीर झाला," असं अमित ठाकरेंनी म्हणताच समर्थकांनी टाळ्या वाजवत त्यांना प्रतिसाद दिला. पुढे बोलताना अमित ठाकरेंनी, "तो उमेदवार जाहीर झाल्या झाल्या मी पहिला फोन संदीप देशपांडेंना केला. मी बातमी ऐकायला लागतो की, कोणीतरी वरळीमधून माघार घेतली तर आम्ही माहिममधून माघार घेऊ. मला माहिती नव्हतं खरं आहे की खोटं आहे. मी पहिला फोन संदीपजींना करुन सांगितलं की माघार घ्यायची नाही. आपण उतरलोय जिंकण्यासाठी आणि जिंकायचं आहेच. ही त्रिकोणी लढाई नाही तर माझ्या समोर पाच किंवा सहा उमेदवार आहेत. 600 उमेदवार असले तरी मला फरक पडणार नाही, कारण मला माहिमकरांवर पूर्ण विश्वास आहे. माहिमकरांनी आतापर्यंत खूप सहन केलं आहे," असं अमित ठाकरे म्हणाले. 

अमित ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या सेनेचं उत्तर

अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केल्याची माहिती समोर आल्यानंतर यावरुन संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, "अमित ठाकरे वयाने लहान आहेत. त्यांनी निवडणूक शांतपणे लढावी. तरुण कार्यकर्ता म्हणून शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत," असं मोजक्या शब्दात उत्तर दिलं. त्यांनी अमित ठाकरेंवर टीका करणं टाळलं.

माहिमच्या समस्या सोडवणारच

दरम्यान आपल्या भाषणामध्ये अमित ठाकरेंनी माहिममधील समस्यांचा उल्लेख करत आपण एका महिन्यात त्या सोडवू असं म्हटलं. "माहीमसारख्या सुसंस्कृत भागात पाण्याची समस्या असावी? देशाच्या आर्थिक राजधानीत असं होणं शोभत नाही. पोलीस वसाहतींमधील दुरावस्था, कोळी बांधवांच्या समस्या, महिलांच्या समस्या आणि पाण्याचा प्रश्न हे गंभीर प्रश्न असले तरी सुटण्यास सोपे आहेत. एकदा संधी दिल्यास, या सर्व प्रश्नांवर मी एका महिन्यात तोडगा काढीन. मी नेहमी विभागात चालत फिरतो, त्यामुळे अनेक नागरिक मला थेट भेटतात आणि त्यांच्या समस्या सांगतात. आमदार नसतानाही मी अनेक प्रश्न सोडवले आहेत; विचार करा, आमदार झाल्यावर मी किती अधिक करू शकतो. माझं ध्येय लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य आणि समाधान आणणं आहे. पूर्वीचा आनंद परत मिळवून देणं हीच माझी महत्वाकांक्षा आहे. माझं व्हिजन खूप मोठं आहे, त्यामुळे या समस्या तर मी सोडवणारच," असं अमित ठाकरे भाषणात म्हणाले.