Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्ता नेमकी कोणाची येणार याचीच चर्चा पाहायला मिळाली. सत्तास्थापनेचा तिढा काही केल्या सुटत नसल्यामुळं दरम्यानच्या काळात राजकीय वर्तुळात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्याचं दिसून आलं. मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद यापैकी पहिलं पद वगळता उर्वरित दोन पदांवरून बरीच मतमतांतरं दिसून आली. (Oath Ceremony)
प्राथमिक माहितीनुसार शिंदेंचा शिवसेना पक्ष राज्यातील गृहखात्यासाठी आग्रही होता. पण, आता मात्र राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या चर्चेत गृहमंत्री पदाचा वाद संपुष्टात आल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांनी दिली आहे. सदर बैठकीतील निर्णयानुसार राज्याचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीसच राहणार असून, एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्रिपद असणार असं स्पष्ट होत आहे. ज्यामुळं आता महायुतीतील गृहमंत्री पदाचा वाद मिटला असून शपथविधीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
एकिकडे हा वाद मिटत असतानचा दुसरीकडे अजित पवारांचा दिल्ली दौरा चर्चेचा विषय ठरत आहे. जवळपास दोन दिवसांच्या दिल्ली मुक्कामानंतर बुधवारी सकाळी अजित पवार मुंबईला जाण्यासाठी निघणार असले तरीही कथित स्वरुपात अमित शाह यांच्या भेटीसाठी अजित पवारांची दुसरी रात्र दिल्लीतच गेल्याचं पाहायला मिळालं. महायुती सरकारचा शपथविधी काही तासांवर येऊन ठेपलेला असताना अजित पवार आपल्या मागण्या घेऊन दिल्लीत प्रतीक्षेत असल्यामुळं त्यांच्या मागण्या भाजपचे वरिष्ठ नेते मान्य करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
बुधवारी भाजपच्या विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडणार असून, मंगळवारी भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी मुंबईत दाखल झाल्यानंतर आता या बैठकीकडे सर्वांचं लक्ष राहील. 'आमदारांशी चर्चा केल्यानंतर भाजपच्या विधीमंडळ नेत्याची एकमतानं निवड होणार' असल्याचं सांगत आमदारांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री ठरवणार असल्याची माहिती खुद्द विजय रुपाणी यांनी दिली.
यादरम्यानच बुधवार हा अनेक राजकीय घडामोडींचा दिवस असल्याचं स्पष्ट होत असून, याच दिवशी महायुती सत्तास्थापनेचा दावा करणार असून, दुपारी महायुतीचे नेते आज दुपारी राज्यपालांची घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला दिली आहे.