हिवाळ्यात पावसाळा अन् तापमानवाढ ; सिंधुदुर्गासह कोणत्या भागात वादळी सरी कोसळणार?

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात चिंता वाढवणारा हवामानाचा अंदाज. फक्त राज्यच नव्हे, तर देशभरात हवामानानं बदलले तालरंग...   

सायली पाटील | Updated: Dec 4, 2024, 06:57 AM IST
हिवाळ्यात पावसाळा अन् तापमानवाढ ; सिंधुदुर्गासह कोणत्या भागात वादळी सरी कोसळणार? title=
Maharashtra Weather News Mumbai Konkan temprature increases winter sidelined due to fengal cyclone latest updates

Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरीही हे वादळ प्रत्यक्षात सक्रीय असल्याच्या तुलनेत ते शमल्यानंतर दिसणारे परिणाम अधिक गंभीर असल्याचं स्पष्ट होत आहे. इथं वादळाची तीव्रता कमी होत असल्याचं चित्र असलं तरीही महाराष्ट्रावर मात्र सातत्यानं हवामान बदलांचा मारा होताना दिसत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अगदी अखेरच्या दिवसापर्यंत ज्या महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीनं मुक्काम ठोकला होता त्याच राज्यावर आता पावसाचे ढग घोंगावताना दिसत आहेत. 

राज्यातील उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता उर्वरित भागांमध्ये तापमान 17 अंशांच्याही पलिकडे पोहोचलं आहे. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद रत्नागिरीमध्ये करण्यात आली असून, कोकणातील सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर क्षेत्रामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सांगली, सातारा, पाचगणी आणि महाबळेश्वर इथंही वातावरण ढगाळ राहणार असलं तरीही या भागांमध्ये काही प्रमाणात हवेतील गारठा जाणवणार आहे असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.  

हेसुद्धा वाचा : गृहमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे का? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने सांगून टाकलं, म्हणाला 'काय हरकत...'

फेंगल चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असतानाच कर्नाटकच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये कमी दाबाचा एक पट्टा सक्रीय असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं महाराष्ट्रामध्ये हिवाळ्यातही थंडीसाठी नव्हे, तर पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. परिणामी राज्यात तापमानवाढ पाहायला मिळणार असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान विभागानं विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा दिला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूरासाठी मात्र पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

 

मुंबईकरांनाही थंडीची प्रतीक्षा 

चक्रीवादळाचा परिणाम मुंबईच्या हवामानावरही होताना दिसत असून, शहरात आता कुठं लागलेली थंडीची चाहूलही नाहीशी होताना दिसत आहे. पुढील काही दिवस हे चित्र कायम राहील, ढगाळ वातावरणामुळं पावसाची चाहूलही लागेल. पण, पाऊस बरसणार मात्र नाही असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आयएमडीच्या वृत्तानुसार यंदाच्या वर्षी डिसेंबर महिन्यात अपेक्षित थंडी पडणार नसून, डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यानच्या काळातही थंडीचं प्रमाण कमीच राहणार आहे. त्यामुळं यंदा हवामानाचं अनपेक्षित रुप सर्वांनाच हैराण करताना दिसत आहे.