Sharad Pawar Meets Bharat Shah: शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने (Sharad Pawar NCP Party) इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपा सोडून शरद पवारांच्या पक्षात दाखल झालेल्या हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने अनेकजण नाराज असून, शरद पवारांसमोर बंडखोरी रोखण्याचं आव्हान आहे. हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेत थेट निवडणुकीत उतरवल्याने प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे आणि भरत शाह यांच्यासारखे पदाधिकारी नाराज असून बंडाच्या भूमिकेत आहेत. यानिमित्ताने शरद पवार आज इंदापूर दौऱ्यावर आहेत.
निवडणूक अर्ज मागे घेण्यासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक असतानाच सर्व पक्षांसमोर बंडखोरांना रोखण्याचं आवाहन आहे. शरद पवारांसमोर अशा अनेकांची नाराजू दूर करण्याचं आव्हान आहे. बंडखोरी रोखण्यासाठी शरद पवारांकडून प्रयत्न सुरु असून त्यांनी भरत शाह कुटुंबाची भेट घेतली आहे. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्याने शाह कुटुंब नाराज आहे.
भरत शाह हे कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. शरद पवारांसोबत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि चिरंजीव राजवर्धन पाटील देखील उपस्थित आहेत. भरत शाह, बंधू मुकुंद शहा आणि शरद पवार यांची बंद दाराआड चर्चा सुरू आहे.
दुसरीकडडे प्रवीण माने यांनी तर अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना निवडणुकीत स्वपक्षीयांच्या रोषाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास त्यांना निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता नाकारत येत नाही. शरद पवार प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे यांचीही भेट घेणार असल्याचं समजत आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर बंड शमणार का? हे पाहावं लागणार आहे.