पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ; शरद पवार पक्षासाठी सुवर्ण संधी

Maharashtra Politics : बीड जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळणार आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. याचा फायदा शरद पवार पक्षाला होणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 22, 2024, 09:25 PM IST
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ; शरद पवार पक्षासाठी सुवर्ण संधी   title=

Maharashtra Assembly Elections 2024 :   महाराष्ट्रात महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली. त्यामुळं बीड जिल्ह्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे भाऊबहीणीचं मनोमिलन झालं. या मनोमिलनाचा आनंद सामान्यांना झाला. पण वर्षानुवर्ष राष्ट्रवादीच्या विरोधात राजकारण करणाऱ्या अनेक नेत्यांना विस्थापित होण्याची वेळ आलीय. येत्या दिवसांत भाजपमधील अनेक नेते हाती तुतारी घेण्याची शक्यता निर्माण झालीय.

बीड जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ घातलीय. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भाऊबहिणींच्या राजकीय मनोमिलनानं भाजपमधील अनेक प्रस्थापितांवर विस्थापित होण्याची वेळ आलीय. बीड भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी कमळ सोडून हाती तुतारी घेतलीये. ही फक्त सुरुवात असून पुढच्या दहा दिवसांत बीड भाजपमधून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग होण्याची शक्यता आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी तसे संकेत दिलेत.

वर्षानुवर्षे राष्ट्रवादीविरोधी राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची महायुतीमुळं राजकीय अडचण झालीय. माजी आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे , माजी आमदार संगीता ठोंबरे, माजी आमदार रमेश आडसकर अस्वस्थ आहेत. यातले सुरेश धस यांच्यासारखे काहीजण शेवटची आशा म्हणून मुंबईवारी करुन पक्षातून पुनर्वसन केलं जाईल या आशेवर आहेत.

बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी चार जागांवर राष्ट्रवादीनं दावा केलाय. दोन जागा भाजपच्या ताब्यात आहेत. 2019मध्ये सहाच्या 5 जागा लढवणाऱ्या भाजपला यावेळी अवघ्या दोन जागांवरच लढायला मिळणार आहे. ही अस्वस्थता शरद पवारांनी हेरलीये. शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीपासून व्युहरचना आखण्यास सुरुवात केलीय. त्यामुळं येत्या काळात भाजपचा बालेकिल्ला रिकामा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x