ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपची सरशी

राज्यात झालेल्या ३ हजार ८९ ग्रामपंचायतींपैकी १ हजार ४५९ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच निवडून आल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केलाय 

Updated: Oct 9, 2017, 08:38 PM IST
ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपची सरशी title=

मुंबई : राज्यात झालेल्या ३ हजार ८९ ग्रामपंचायतींपैकी २ हजार ८६१ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. यापैकी १ हजार ४५९ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच निवडून आल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केलाय. तर, १८१ सरपंचांसह काँग्रेस दुसऱ्या स्थानावर असल्याचा दावाही भाजपनं केलाय. शिवसेना १६३ ग्रामपंचायतींसह तिसऱ्या तर ११६ ग्रामपंचायतींसह राष्ट्रवादी शेवटच्या स्थानावर असल्याचंही भाजपकडून सांगण्यात आलंय. १४७ ग्रामपंचायतींमध्ये अपक्ष सरपंचांनी बाजी मारली आहे.

एक नजर टाकूयात राज्यातील ग्रामपंचायत निकालावर:

नाशिक: 

नाशिक जिल्ह्यातील १७१ ग्रामपंचायतीतील १६४७  जागांसाठी झालेल्या निवडणूकांचे निकाल जाहीर झाले. एकूण १ हजार २० जागांसाठी २ हजार १४० उमेदवार निवडणूक रिंगणात असून या निवडणुकीत तब्बल ६२७ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीची सरशी झालेली दिसून येते आहे.

धुळे:

धुळे जिल्ह्यात पूर्वी प्रमाणेच काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहील आहे. धुळे, शिरपूर, साक्री तालुक्यात काँग्रेस पक्षाने बाजी मारली असून शिंदेखडा तालुक्यात मंत्री जयकुमार रावल यांनी आपली प्रतिष्ठा जपली आहे. धुळे तालुक्यात काँग्रेस पक्षाने ३३ पैकी २० वर बाजी मारली आहे तर शिवसेना येथे क्रमांक दोनवर राहीली आहे. शिरपूर तालुक्यात बोराडी आणि इतर काही ग्रामपंचायत सोडल्या तर आमदार अमरीश पटेल यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा विश्वास दाखवत काँग्रेस पक्षाच्या पारड्यात १३ ग्रामपंचायत टाकल्या आहेत. आमदार डी एस अहीरे यांच्या पत्नी कुडाशीमध्ये सरपंच झाल्या आहेत. एकूण जिल्ह्यात १०८ ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायत बिनविरोधात झाल्या तर १०० मध्ये निवडणूक झाली होती.

नंदुरबार:

नंदुरबार जिल्ह्यात ५२ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रीया राबविण्यात आली. ९ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे ४२ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. सोमवारी जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने बाजी मारल्याचे चित्र आहे तर काही ग्रामपंचायतीवर काँग्रेस आणि भाजपा यांनी दावा सांगितल्याने संभ्रमावस्था आहे. जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या विसरवाडी ग्रामपंचायतीवर काँग्रेसने आपली सत्ता कायम ठेवली आहे. तर अक्कलकुवा मोलगी आणि खापर या ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन होऊन भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत.

अहमदनगर:

१० ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांची बिनविरोध निवड झाली. मतमोजणीस सकाळी १० वाजता सुरुवात झाली. सरपंचपदासाठी ६३७ आणि सदस्यपदासाठी ३ हजार ५५० असे एकूण ४ हजार १८७ उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं. यावेळी पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंचपदाची निवड झाल्यामुळे निवडणुकीला वेगळंच स्वरुप आलेलं होतं.

अकोला: 

अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के देत परिवर्तनाची लाट पहायला मिळालीय. तर, जिल्ह्याच्या राजकारणातील अनेक नेत्यांना आपले गड कायम राखण्यात यश मिळाले. अकोला जिल्ह्यात २६२ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झालेत. जिल्ह्यातील बहूतांश ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवल्याचा दावा भाजप, भारिप आणि शिवसेना या प्रमुख पक्षांनी केलाय. अकोला जिल्ह्यात एकूण २७२ ग्रामपंचतींच्या निवडणुका होत्या. यातील १० ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत.