दहावी नापास झाल्यावर काय करावे?

Career For 10th Fail:  तुम्ही दहावीत अनुत्तीर्ण असाल किंवा तुमच्या ओळखीत कोणी असेल तर त्याला पुढील टिप्स नक्की सांगा. 

Pravin Dabholkar | Updated: May 27, 2024, 02:11 PM IST
दहावी नापास झाल्यावर काय करावे? title=
Caree After 10th Fail

Career For 10th Fail: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी करिअरच्या नव्या वाटा शोधू लागले आहेत. तर काही विद्यार्थी कमी गुण मिळाल्याने अथवा अनुत्तीर्ण झाल्याने निराश झाले असतील. त्यांनी निराश होण्याचे अजिबात कारण नाही. कारण तुम्ही दहावी नापासा झाला असाल तरी काय करु शकता? याबद्दल माहिती जाणून घेऊया.  दहावीमध्ये नापास झाल्यावर काही मुलं तणावग्रस्त होतात. काहीजण तर आयुष्य संपवण्यापर्यंतचे टोकाचे पाऊल उचलतात. अपयश आल्याने आयुष्य संपत नाही. दहावीत अनुत्तीर्ण असलेल्या अनेकांनी भविष्यात आपले करिअर उज्ज्वल केले आहे. तुम्ही दहावीत अनुत्तीर्ण असाल किंवा तुमच्या ओळखीत कोणी असेल तर त्याला पुढील टिप्स नक्की सांगा. 

सर्व प्रथम, घाबरू नका

निकाल पाहिलात आणि त्यात फेल असं लिहिलंय? अजिबात काळजी करु नका. आपला आलेला निकाल मान्य करा. जीवन हे चढ-उताराचे नाव आहे. यात यश आणि यश येतच राहतील, अपयश येत राहतील. त्यामुळे यातील अपयशाने आयुष्य संपत नाही. निकाल बदलता येत नाही पण तो स्वीकारला तर पुढे जाण्यास बळ मिळते. काही वाईट विचार येत असतील तर आपल्या पालकांशी, सल्लागारांशी, समुपदेशकांशी बोला. तुमच्या उणिवा समजून घ्या आणि त्यावर काम कराजर आपण 10वी मध्ये नापास झालो तर सर्वात आधी आपल्या उणिवा आणि चुका समजून घेऊन त्यावर काम करायला हवे.

ज्या विषयात नापास झाला असाल ती पुस्तके आणि नोट्स पुन्हा हातात घ्या. त्या वाचा. आपण कोणत्या विषयात कमकुवत होतो ते पाहा. कोणते विषय आणि संकल्पना समजण्यात अडचण आली याबद्दल शिक्षकांशी बोला. त्यांना अतिरिक्त मदतीसाठी विचारा.

झालेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाहा. कोणत्या प्रश्नांची उत्तरे चुकीची लिहिली गेली ते पहा. तुमच्या झालेल्या चुकांमधून शिका.  तुमच्या वाचनाच्या सवयी आणि वेळेचा विचार करा. कोणत्या सवयी तुमच्यासाठी हानिकारक आहेत ते पहा आणि त्या बदलण्याचा प्रयत्न करा. 

एखादा विषय अवघड वाटत असेल तर त्या विषयासाठी शिकवणी घेण्याचा विचार करा. उणिवा समजून घेऊन त्यावर काम केल्यास पुढच्या वेळी तुम्ही अधिक चांगली कामगिरी करू शकाल. त्यामुळे दहावी उत्तीर्ण होण्याची शक्यता खूप वाढते.

कंपार्टमेंटल परीक्षा द्या

कोणत्याही एका विषयात नापास झाला असाल तर तुम्ही त्याची कंपार्टमेंटल परीक्षा देऊन यावर्षी 10वीची परीक्षा पास करू शकता. कंपार्टमेंटल परीक्षा देऊन तुमचे वर्ष वाचते, त्याच वर्षी तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता.

पुढील वर्षी पुन्हा परीक्षा द्या

जर तुम्ही 10वी मध्ये नापास झालात तर एक वर्ष तुमच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करून पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा देणे हा एक चांगला पर्याय आहे. NCERT पुस्तके, नोट्स आणि मागील पेपर्सचा नीट अभ्यास करा. व्हिडिओ लेक्चर्स देखील पहात रहा. मॉक टेस्ट आणि सॅम्पल पेपर सोडवत राहा म्हणजे तुम्हाला लिहिण्याची सवय लागेल. यामुळे वेळेचे व्यवस्थापनही सुधारेल.कमकुवत विषय आणि विषयांवर अधिक लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्या संकल्पना स्पष्ट करा.एक वर्षाचा योग्य वापर करून आणि उणिवांवर काम केल्यास पुढील वर्षात चांगले गुण मिळवता येतील. पुन्हा परीक्षा दिलेले बहुतांशजण उत्तीर्ण होतात. 

मुक्त विद्यालयातून 10वीची परीक्षा द्या

10वीत नापास झाल्यास ओपन युनिव्हर्सिटीतून 10वी बोर्डाची परीक्षा द्या. हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये: NIOS सारख्या खुल्या शाळांमध्ये 10वीच्या परीक्षेसाठी नोंदणी करावी लागते. हे ऑनलाइन किंवा जवळच्या अभ्यास केंद्रावर केले जाऊ शकते.दहावीच्या नोट्स, सोडवलेले पेपर, सॅम्पल पेपर इत्यादी मागवून वाचावे लागतील. अर्जासोबत बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध आहे. त्यानुसार परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा सामान्य बोर्डाच्या परीक्षेसारखीच आहे आणि उत्तीर्ण गुण देखील जवळपास सारखेच आहेत. ओपन स्कूलमधून 10वीची परीक्षा देऊन तुम्ही 12वी आणि महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकता. येथून तुम्हाला पदवीपर्यंतची शिक्षण घेता येते. हे नोकरीसाठीही वैध असून हा एक उत्कृष्ट पर्याय आहे.

ITI कोर्स करा

10वी मध्ये नापास झाल्यास आयटीआय, कोणताही डिप्लोमा किंवा व्यावसायिक कोर्स करणे हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये  तुमच्या आवडीनुसार ITI कोर्स निवडू शकता. इलेक्ट्रीशियन, फिटर, वेल्डर, मेकॅनिक इ. असे पर्याय तुमच्यासमोर आहेत. हे 1 वर्षाचे प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा कोर्स असतात. त्यांची फी खूपच कमी आहे. या अभ्यासक्रमांनंतर तुम्हाला त्या क्षेत्रात काम करण्याच्या चांगल्या संधी मिळतात.  यानंतर ॲडव्हान्स डिप्लोमाही करता येतो.  आयटीआय कोर्स केल्याने तुम्हाला रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील आणि स्वावलंबी होण्यास मदत होईल.