Maharashtra CM Sign Files: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद आणि फाईल्स हा वाद वर्षानुवर्षे आपण पाहल आलो असू. अगदी कॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असल्यापासून ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत. मुख्यमंत्री फाईल्सवर सह्या करत नाहीत, असा आरोप नेहमी केला जातो. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात किती फाईल्स आल्या आणि किती फाईल्सवर सह्या करण्यात आल्या? याची माहिती देण्यात आली आहे. यावरुन ठाकरे गटाला टोलादेखील लगावण्यात आला आहे.
महायुती सरकारच्या 25 महिन्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल 22 हजार 364 फाईल्सचा निपटारा केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या तुलनेत दुप्पट फाईल्सचा निपटारा आणि तिप्पट कामांना मंजुरी देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक नव्हे तर फेस टू फेस काम करणारे सरकार असल्याचे दाखवून दिल्याचा टोला यानिमित्ताने लगावण्यात आला आहे. इतक्या कमी कालावधीत हजारो फाइलींचा निपटारा करुन मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) विक्रमी कामगिरी केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
1 जुलै 2022 ते 31 जुलै 2024 या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा दुप्पट वेगाने फाईलींचा निपटारा केल्याची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी 25 महिन्यांत तिप्पट कामांना मंजुरी दिली. राज्यातील विकासकामांचे प्रस्ताव आणि जनहिताच्या फाईल्सचा वेगाने पाठपुरवठा करून मुख्यमंत्री कार्यालयाने मंजूर केल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ अडीच दिवस मंत्रालयात गेले होते. उर्वरित काळात फेसबुकवर काम करुन त्यांनी राज्याचा प्रगतीचा गाडा रोखला होता. विकास कामांना स्थगिती देऊन महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात पिछाडीवर नेण्याचे काम ठाकरेंनी केले होते, अशी टिका यावेळी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंच्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुप्पट फाईल्सला मंजुरी दिली आहे. याच काळात राज्यातील विविध प्रकारच्या तिप्पट कामांना मंजुरी दिली असून राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यात आल्याची माहिती शिंदे गटाने दिली आहे.
आकडेवारीनुसार गेल्या 25 महिन्यात मुख्यमंत्री कार्यालयाकडे 23 हज़ार 674 फ़ाईल्स प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी 22 हजार 364 फाईल्सला मंजुरी देण्यात आली. राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाची ही आजवरची विक्रमी कामगिरी असल्याचे सांगण्यात आले आहे. तर 1 जानेवारी 2020 ते 20 मे 2022 या महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे 11 हजार 227 फाईल्स प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी केवळ 6 हजार 824 फाईल्स मंजूर करण्यात आल्या होत्या, अशी माहितीदेखील देण्यात आली आहे.