मुंबई : पर्यटन हा एक प्रमुख सेवा उद्योग असून राज्याच्या आर्थिक विकासाच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. हे लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने 'ताज'चे पंचतारांकित हॉटेल्स कोकणात उभारण्यास परवानगी दिली आहे. तसा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली.
कोकणातल्या या सुंदर हॉटेलच्या स्थापनेमुळे कोकणातील नैसर्गिक सौंदर्याशी सुसंगत अशा शाश्वत पर्यटन आणि शाश्वत विकासामध्ये भर पडण्यासाठी मदत होणार आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 10, 2020
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन केंद्रासाठी ताज ग्रुपला भाडेपट्टयाने जमीन देण्याचा निर्णय राज्यच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मौ. शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्यासाठी ताज ग्रुपच्या मे.इंडियन हॉटेल्स कंपनीला ५४.४० हेक्टर जमीन ९० वर्षाच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टयाने देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिरोडा येथे ताज हॉटेल्सचं पंचतारांकित हॉटेल उभारण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती. २२ वर्षापासून पंचतारांकित हॉटेलला मंजुरीची प्रतीक्षा होती #Taj #Sindhudurg @AUThackeray @samant_uday @ashish_jadhao
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 10, 2020
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा येथे ताज ग्रुपच्या हॉटेल स्थापनेसंदर्भात पर्यटन विभागाचा प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल मी मंत्रिमंडळाचे आभार मानतो. जवळपास २२ वर्षांपासून हा प्रस्ताव रखडलेला होता परंतु महाविकास आघाडी सरकारने तो मंजूर करून घेतला.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 10, 2020
यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिले पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने भूसंपादित केलेली जमीन दीर्घ भाडेपट्टयाने इंडियन हॉटेल्स कंपनीला देण्यात येईल, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.