मुंबई : महाराष्ट्रातील शहरांमधल्या शाळा, कॉलेज बंद ठेवण्याच्या निर्णयानंतर आता ग्रामीण भागातील शाळा तसेच कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत शाळा, कॉलेज बंद राहणार आहेत.
राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असून शहरी आणि ग्रामीण अशा सर्व कॉलेजना हा निर्णय लागू असेल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सर्व प्राध्यापक २६ मार्चपर्यंत वर्क फ्रॉम होम करतील, अशी माहितीही त्यांनी दिली. सर्व इंजिनिअरिंग कॉलेजनादेखील हा निर्णय लागू राहील. प्राध्यापक आणि शिक्षकांना वेळ पडल्यास सुचनेनुसार कॉलेजमध्ये यावं लागेल, अशी माहिती सामंत यांनी दिली.
खाजगी क्लासेस बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत घरी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परदेशी विद्यार्थी आपल्या देशात गेलेत. त्यांना लगेच परत येऊ नका अशा सूचना दिल्या आहेत, अशी माहिती सामंत यांनी दिली.
महाराष्ट्रातील शहरी भागातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी सरकारनं घेतला होता. आता ग्रामीण भागातील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्यमंत्र्यांसह राज्यातील परिस्थितीचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. त्यानंतर टोपे यांनी ही माहिती दिली. शाळा बंद ठेवण्याची तसेच विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही शिक्षक संघटना आणि विद्यार्थी संघटनांनीही केली होती.