अतिवृष्टीच्या संकटानं बळीराजाला घेरलं, पोराबाळांचं शिक्षण सुटलं, कर्जाचा डोंगर वाढला

अतिवृष्टीमुळे मोडलेला आणि कर्जाने पिचलेल्या शेतकऱ्याचा जगण्यासाठी संघर्ष 

Updated: Oct 27, 2022, 10:08 PM IST
अतिवृष्टीच्या संकटानं बळीराजाला घेरलं, पोराबाळांचं शिक्षण सुटलं, कर्जाचा डोंगर वाढला  title=

मयूर निकम, झी मीडिया, बुलडाणा : असं म्हणतात की दिवाळीची पहाट ही आनंद घेऊन येते, पण बळीराजाची दिवाळी पहाटही अंधारात गेली. पोटच्या पोरासारखं सांभाळलेल्या पिकाची परतीच्या पावसानं पार माती केलीय. पिकांसह जमिनीचाही बट्ट्याबोळ झालाय. बुलडाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातल्या भेंडवळ गावातले अल्पभूधारक शेतकरी शिवाजी वाघ यांच्याकडे दोन एकर शेती आहे. शेतात सोयाबीन आणि तुरीचं उत्पादन ते घेतात. पण गेल्या काही वर्षांपासून परतीचा पाऊस त्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेतोय.

यंदादेखील त्यांचा परतीच्या पावसानं घात केला आणि दोन एकर शेतात केवळ दोन क्विंटल सोयाबीन झालं. यामुळे मात्र त्यांच्यावरचा कर्जाचा डोंगर वाढतच चाललाय. ह्या परतीच्या पावसानं दिवाळीत केवळ दिवाळंच काढलं नाही तर त्यांच्या आठवीतल्या पोराच्या शाळेचाही घात केला. 

शिवाजी वाघ यांच्यासारखीच अवस्था आहे निर्मलाबाई बोदडे यांची. त्यांचं वय 75च्या आसपास आहे. पती जाऊन 25 वर्ष झाली, घरात अपंग मुलगा असल्यानं शेतात त्यांनाच काबाड कष्ट करावं लागतं. दोन एकर शेतात त्यांनीही सोयाबीन पेरलं. पण परतीच्या पावसानं होत्याचं नव्हतं केलं. व्याजानं घेतलेल्या पैशांची परतफेड कशी करायची याचा घोर त्यांना लागलाय. 

अतिवृष्टीनं सारं हिरावून नेलं तर विम्यातून थोडीफार मदत मिळेल अशी आशा असताना त्यातूनही अजून भरपाई झालेली नाही. त्यामुळे अतिवृष्टीमुळे मोडलेला आणि कर्जान पिचलेल्या शेतकऱ्यावर अक्षरश: जगण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.