कोल्हापूर : पाणी आल्यामुळे घर सोडावे लागले. मात्र सारे चित्त घराकडेच लागले आहे, अशी स्थिती झालीय कोल्हापुरातल्या मदत छावणीत आलेल्या महिलांची. इथे आलेल्या महिलांच्या डोळ्यातले ना पाणी आटत आहे, ना बाहेर पुराचं पाणी ओसरत आहे. कोल्हापुरातल्या शिरोळमधल्या पद्माराजे विद्यालयात तात्पुरती सोय करण्यात आलेल्या या महिला एकमेकींचे अश्रू पुसून परस्परांना आधार देत आहेत.
सांगलीतही तशीच परिस्थिती आहे. महापुराने अर्ध्या शहराला पाण्याखाली घेतले आहे. त्यामुळे टिळक चौक, गणपती पेठ, हरभट रोड, मारुती चौक, बसस्थानक परिसराचे तीनही मार्ग, गावभाग, रिसाला रोड, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, पत्रकारनगर गेल्या दोन दिवसांपासून सुमारे बारा फूट पाण्यात बुडाला आहे. हे पाणी ओसरेपर्यंत आणखी दोन दिवस पाण्यात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी तसेच नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे.
सांगली बसस्थानकमार्गे सिव्हिल रस्त्यावर पाणी पोहोचले असून, गणेशनगरातील अनेक गल्ल्यांत पाणी घुसलेले आहे. शामरावनगरमार्गे महापुराचे पाणी रामकृष्ण परमहंस सोसायटीपर्यंत पोहोचले आहे. तसेच साई मंदिरापर्यंत रस्ता पाण्याखाली गेला आहे. खणभागातूनही हिराबागपर्यंत पाणी पोहोचले असून, फौजदार गल्लीसह अनेक गल्ल्यांत पाण्यात गेले आहेत.
महापुरामुळे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ६७ हजार हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अन्य पिकांबरोबरच उसालाही धोका निर्माण होऊ शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी पूरग्रस्त भागात राज्य आणि केंद्र सरकारनं तातडीनं कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केलीये. पीकाबरोबरच मातीही वाहून गेल्यामुळे नुकसान अधिक होणार असल्याचं ते म्हणाले.
एकीकडे स्थानिक लोक, सामाजिक संस्था पूरग्रस्तांना मदतीसाठी धावत येत असताना, प्रशासकीय यंत्रणा नावाची गोष्ट कोल्हापुरातल्या शिरोळमध्ये दिसून येत नाही. सामाजिक संस्था सर्व काही बघून घेतील अशीच भूमिका प्रशासनाची राहिली आहे. तरीही प्रशासन मात्र बिनदिक्कत सर्व मदत केली जात असल्याचा दावा करत आहे.