'देशातला २५ टक्के रोजगार महाराष्ट्रात'; मुख्यमंत्र्यांचा दावा

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Updated: Sep 16, 2019, 12:39 PM IST
'देशातला २५ टक्के रोजगार महाराष्ट्रात'; मुख्यमंत्र्यांचा दावा title=

कराड : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र ८व्या क्रमांकावर होता, हे त्यांनी मान्य केल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला. तसंच महाराष्ट्र १३व्या क्रमांकावर गेल्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा मुख्यमंत्र्यांनी खो़डून काढला आहे.

देशातील २५ टक्के रोजगार हा महाराष्ट्राने दिला असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. याबाबत निती आयोग आरबीआयचा अहवाल आणि ईपीएफओ खाती याची माहिती उपलब्ध असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

उदयनराजे भोसले यांनी तीन महिन्यात राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. हा लोकशाहीचा खून असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकशाहीच्या खुनाबद्दल बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही. काँग्रेसच्या काळात आणीबाणी लाऊन आणि राज्य सरकारं बरखास्त करुन कशाप्रकारे लोकशाहीचा खून करण्यात आला, हे आपण पाहिलं आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

तसंच भाजप-शिवसेनेची युती होणार. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्व २८८ जागांसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या. युती होईल अशीच सध्या वाटचाल सुरु आहे पण युती तुटतीलच तर २८८ जागांवर लढावं लागणार आहे. त्यासाठी सर्वांनी तयारीला लागा असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. सोबतच युती होणारच आहे, पण तरीही गाफील राहून चालणार नसल्यानं तयारीला लागण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना केल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी युती होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.